मंदार लोहोकरे

पंढरपूरचे बहुतांशी अर्थकारण हे आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या वारीवर अवलंबून असताना यंदा करोना विषाणू फैलावामुळे वारीवर निर्बंध आल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. वारीच्या काळात होणारी कोटय़वधी रुपयांची उलाढाल यंदा होणार नाही. त्याचप्रमाणे भाविकांना विठुरायाचे दर्शन होणार नाही, याची सल वेगळीच. करोनामुळे पंढरपूरचे अर्थकारण बिघडले आहे.

‘अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर’ या अभंगाप्रमाणे हरिनामाचा जयजयकार, टाळ-मृदुंगाचा नाद आणि भक्तिमय वातावरण दरवर्षी आषाढीच्या काळात ज्या पंढरी नगरीत असते ती आषाढी एकादशीच्या तोंडावर शांत आहे. करोनामुळे यंदा वारीवर राज्य सरकारने निर्बंध आणले. यंदा प्रतीकात्मक वारी निघणार आहे. वारी नसल्याने स्थानिक व आसपासच्या व्यापारी व नागरिकांचे अर्थकारणच बिघडले. कारण या काळात मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उलाढाल होऊन नागरिकांना चार पैसे मिळतात. यंदा मात्र ते काहीच मिळणार नाही.

पंढरपूरला दक्षिण काशी संबोधले जाते, तर वारकरी संप्रदायात आद्य पीठ. शेतकरी मृग नक्षत्राची वाट पाहतो. त्याच वेळी त्याला ओढ असते सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची. पेरणीची कामे करून वारी पोहोचती करण्याचा शिरस्ता अनेक जण पिढय़ान्पिढय़ा आजही सांभाळत होते. दुसरीकडे येथील व्यापारी आपल्या वर्षांचे गणित मांडून उदरनिर्वाह करतात. वारीला चांगली गर्दी झाली की आर्थिक उलाढाल वाढते. नगरपालिकेचा कर म्हणजेच घरपट्टी आषाढी वारीनंतर भरली जाते. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडून शहरातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध होतो. साधारणपणे जगद्गुरू तुकोबाराया आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान झाले की पंढरीकडे भाविकांचा येण्याचा ओघ वाढत असतो. पुढे प्रक्षाळपूजा म्हणजेच आषाढी एकादशीनंतर सातव्या दिवसापर्यंत भाविक येऊन दर्शन घेऊन आपल्या गावी जातो. साधारणपणे १० ते १२ लाख भाविक आषाढी वारीसाठी पंढरीत येतात असा प्रशासनाचा अंदाज आहे. कुंकू, बुक्का, प्रसाद, छायाचित्रे आदी वस्तू खरेदी करणे किंवा राहणे, खाणे-पिणे यावर भाविक खर्च करतात. यात्रेत येणारे हौशे-गवशे हेदेखील काही ना काही खरेदी करीत असतात. यातून काही कोटी रुपयांची उलाढाल या आठ-दहा दिवसांमध्ये होते.

आषाढी वारीसाठी शहरातील व्यापाऱ्यांबरोबरच बाहेरील व्यापारीदेखील माल घेऊन येतात. वारीच्या काळात शासनालाही चांगला महसूल मिळते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला गेल्या आषाढीच्या काळात ४ कोटी ४० लाख रुपये उत्पन्न मिळाले. एस. टी. महामंडळाला २२ कोटी ४९ लाख उत्पन्न मिळाले होते. रेल्वे विभागाला १ कोटी २ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. तसेच पंढरपूर पालिकेला आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीसाठी ५ कोटी रुपये अनुदान दिले जाते, तर आषाढी वारीनंतर पालिकेची जवळपास ४० ते ५० टक्के घरपट्टी जमा होते. वारी नसल्याने हे सारे आर्थिक व्यवहार यंदा होणार नाहीत. यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वारी नसल्याने खरेदी नाही. त्यामुळे आसपासच्या गृहउद्योगांवर संकट कोसळले आहे. वारीच्या अगोदर स्थानिकांना आणि त्या परिसरातील छोटय़ा-छोटय़ा उद्योगांना कामे मिळतात. यंदा हे उद्योग बंद पडले आहेत.

चैत्री वारीच्या सामग्रीचे नुकसान 

करोनाच्या संकटामुळे येथील सर्व व्यापारी मोठय़ा आर्थिक संकटात सापडले आहेत. चैत्री वारीसाठी भरलेली काही सामग्री व्यापाऱ्यांना नष्ट करावी लागला. प्रासादिक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात आषाढी वारी होणार नाही. त्यामुळे व्यापारी दुहेरी संकटात सापडल्याचे पश्चिमद्वार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबाराव महाजन यांनी सांगितले. चैत्र वारीला ३ एप्रिल रोजी एकादशी होती. या एकादशीची तयारी महिनाभर आधी येथील प्रशासन, व्यापारी करीत असतात. मात्र याच काळात करोनाचे संकट आले आणि २५ मार्चपासून देशात टाळेबंदी लागू झाली. चैत्र वारीच्या आशेवर येथील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात साहित्य-सामग्री भरून ठेवली होती, मात्र त्याची विक्रीच झाली नाही. आता तर आषाढी वारीत मोजक्याच भाविकांना परवानगी देण्याचे सरकारने जाहीर केले. त्यामुळे व्यापाऱ्यांची उरलीसुरली आशादेखील संपुष्टात आली आहे.