News Flash

विधान परिषदेतील फुंडकरांच्या रिक्त जागेवर अरुण अडसड यांना संधी?

पक्षनिष्ठेसोबतच एक बुलंद तोफ  म्हणून परिचित अडसडांच्या संघटन चातुर्याची पक्षात दखल घेतली जाते.

संग्रहित छायाचित्र

भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

फुंडकर यांची २०१४ साली विधान परिषदेवर निवड झाली होती. विधानसभेच्या आमदारांद्वारे विधान परिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या आमदारांच्या कोटय़ातील ही जागा आहे. भाजपचा झेंडा पश्चिम विदर्भात फडकवीत ठेवणारे नेते म्हणून अडसड यांचे पक्षात स्थान आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका ते लढले.  ते दोनदा चांदूर (रेल्वे) मतदारसंघातून विजयी झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याऐवजी दुसरा चेहरा देण्याचा व अडसडांना अन्य जबाबदारीत सामावून घेण्याचा प्रस्ताव अडसडांनी नाकारला होता. पण मोदी लाटेत व खुद्द मोदींची सभा चांदूरात होऊनही त्यांना परत पराभव पत्करावा लागला होता. १९९५ मध्ये युतीची सत्ता असताना पराभव होऊनही अडसडांना विदर्भ वैधानिक मंडळाचे अध्यक्षपद देऊन सन्मानित करण्यात आले होते हे येथे उल्लेखनीय. मात्र तेव्हापासून राजकारणात व पक्षातही काहीसे बाजूला पडलेल्या अडसडांचा ज्येष्ठ निष्ठावंत म्हणून विचार सुरू झाला आहे.

पक्षनिष्ठेसोबतच एक बुलंद तोफ  म्हणून परिचित अडसडांच्या संघटन चातुर्याची पक्षात दखल घेतली जाते. पण पक्षांतर्गत राजकारणात नितीन गडकरींपेक्षा ज्येष्ठ असल्याच्या भूमिकेत वावरल्याने त्यांची मधल्या काळात कोंडी झाली होती. गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्याचे कधीकाळी नाकारणारे अडसड कालांतराने मवाळ झाल्याचे पक्षनेते सांगतात. मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीससुद्धा त्यांच्या शब्दास किंमत देत असल्याचे निदर्शनास आणले जाते. याच पाश्र्वभूमीवर सत्तेच्या काळात या ज्येष्ठ नेत्याची दखल घेतलीच पाहिजे, असा सूर लावला जात आहे.

तेली-कुणबी वादाच्या राजकारणात तेली समाजाचे पारडे पक्षात उंचावल्याची चर्चा सुरू झाल्याने फुंडकरांच्या जागेवर तसाच बहुजन समाजाचा चेहरा देण्याचा विचार पुढे आला. अरुण अडसड यांचा विचार होत असल्याच्या वृत्तास खासदार रामदास तडस यांनी दुजोरा दिला. मात्र अधिक भाष्य करणे त्यांनी नाकारले.

मिळेल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार

ही घडामोड माझ्या कानावर आली आहे, पण मी स्वत: दावा केलेला नाही. तो माझा पिंड नाही. पद नसूनही मी विदर्भात पक्षाचे काम करीतच आहे. नाराजीचा प्रश्न नाही. पक्षाने ठरवावे. निष्ठेवर शंका घ्यावी असे कृत्य मी कधी केले नाही. जबाबदारी मिळाली तर काम करू, असे अरूण अडसड म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 3:00 am

Web Title: pandurang fundkar arun adsad maharashtra legislative council
Next Stories
1 ‘बीड-उस्मानाबाद-लातूर’चा आज निकाल
2 सातबाऱ्यावरील ओसाड जमिनी नोंद नुकसान भरपाईतील मोठा अडसर
3 निवडणुकांतील अपयशामुळे शरद पवारांना नैराश्य, चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र
Just Now!
X