|| वसंत मुंडे

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी वर्षभरातच पर्यायी भगवान भक्तीगडाची स्थापना करून दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पक्षांतर्गत विरोधकांना पहा, गर्दी कोणाकडे आहे? असे सांगत आपणच ‘किंग’ असल्याचे दाखवण्याची संधी सोडली नाही. मेळाव्यात वेगवेगळ्या भागांतून आलेल्या लोकांचा उल्लेख करत आपला अनेक मतदारसंघांत प्रभाव असल्याचेच पक्षनेतृत्वाला सूचित केले. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना लक्ष्य करताना आपलेच नेतृत्व समाजाच्या हिताचे असल्याचे ठासवले. पंधरा आमदार, घटक पक्षांचे नेते आणि वेगवेगळ्या धर्माच्या संतांना एकत्र आणून मुंडेंनी नेतृत्वाचेही ‘सीमोल्लंघन’ करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

बीड जिल्ह्य़ातील सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे पंकजा मुंडे यांनी वर्षभरात पर्यायी भगवान भक्तीगडाची स्थापना करून दसरा मेळाव्यातून वंजारा समाजावरील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावर दसरा मेळाव्याला बंदी घातल्यानंतर पंकजा मुंडेंचा मेळावा कुठे आणि कसा होणार? याचीच उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र संत भगवानबाबा यांच्या जन्मगावी नवा गड उभा करून आपला राजकीय गडही कायम राखला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर माधवंमचा प्रयोग यशस्वी करत राज्यातील अनेक मतदारसंघांत आपली राजकीय ताकद निर्माण करून पक्षांतर्गत स्पध्रेतही दसरा मेळाव्यातून प्रभाव वाढवला होता. पंकजा मुंडे यांनीही दसरा मेळाव्यातील गर्दीतून पक्षांतर्गतही आपणच ‘लोकप्रिय’ असल्याचे दाखवण्याची संधी साधली. समर्थकांनी पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात अशी जाहीर अपेक्षा व्यक्त करत घोषणाबाजीही केली. याचा उल्लेख करत मुंडे यांनी आपल्याला पदाची लालसा नाही, मात्र आपण किंगमेकर असल्याचे सांगत पक्षांतर्गत स्पध्रेत आपणच किंग असल्याचे सूचित केले. पक्षांतर्गत स्पध्रेत पंकजा यांच्याकडील महत्त्वाचे जलसंधारण खाते काढल्यानंतर पक्षात त्यांचे राजकीय पंख छाटले जात असल्याची भावना समर्थकांतून व्यक्त होते.

तर भगवानगडाच्या वादातही वर्षभरापूर्वी ऐनवेळी प्रशासनाने मेळाव्याला परवानगी नाकारली. यामागे पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण मानले जाते. तर राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सातत्याने मंत्री मुंडे यांच्या विभागातील कारभारावर आरोप करत परळी मतदारसंघातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पातळीवर त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरकारमधूनच रसद पुरवली जाते असाही आरोप केला जातो. या पाश्र्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी मात्र चार वर्षांत वडील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ अठरा एकर जागेवर गोपीनाथगडाची तर भगवान भक्तीगडाची निर्मिती करून संत भगवानबाबा व दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या समाजाला जोडून ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. महाराष्ट्रात जातीचे राजकारण लपून नाही. त्यामुळे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्यासह राज्यातील पंधरा आमदारांना आणि विविध जाती-धर्मातील संत महंतांना एकत्र आणले. ऊसतोडणी मजूर हा दिवंगत मुंडेंची सामाजिक व राजकीय शक्ती मानला जात. मंत्री मुंडे यांनीही दसरा मेळाव्यात ऊसतोडणी महामंडळाची घोषणा करताना ऊसतोडणी मजुरांचे नेतृत्व आपल्याकडे ठेवले.