दसरा मेळाव्याला भगवान गडावर येण्याचा निश्चिय केलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना रोखण्यासाठी गडाचे महंत नामदेव शास्री यांनी रणनिती तयार केली आहे. दसरा मेळाव्या दिवशी गर्दी जमल्यास लोकांना कसे परतवून लावायचे याबद्दल नामदेव शास्रींनी आपल्या अनुयायांना मार्गदर्शन दिल्याची ध्वनि फीत सध्या व्हायरल होताना दिसत आहे. दसरा मेळाव्या दिवशी आपल्या अनुयायांनी काय करावे, याबाबत महंत नामदेव शास्रींनी ध्वनी फीतीतून  सूचना दिल्या आहेत. विशेष गणवेश परिधान करुन  एका रांगेत उभे रहाण्याचा सल्ला त्यांनी आपल्या अनुयायांना दिला असून बीड आणि परळीचे लोक तुमच्यावर दादागिरी करतील, असा सावधानतेचा इशाराही शास्रींनी दिला आहे.
‘दसऱ्या दिवशी गडावर येणाऱ्या गाड्या अडवू नका, वाहतुक कोंडी होऊ दे! त्यामुळेच निम्मी गर्दी कमी होईल.’ असे शास्री या ध्वनी फीतीतून सांगितले आहे. तसेच वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांचे पालन करा, असे महंतानी ध्वनि फितीमध्ये म्हटले आहे. व्हायरल झालेल्या या ध्वनिसंभाषणाची फीत नामदेव शास्री यांच्या आवाजातील असली, तरी ही ध्वनी फित त्यांचीच आहे का?  याबात कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरून महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष  पंकजा यांच्या एका कथित ध्वनिसंभाषणातील वादग्रस्त वक्तव्यामुळे तीव्र झाला होता. यापूर्वी पंकजा मुंडे यांच्या कथित ध्वनिसंभाषणाची एक फीत शुक्रवारपासून ‘समाज माध्यमां’वर सर्वत्र प्रसारित झाली. या ध्वनिफितीमध्ये अनेक वादग्रस्त वक्तव्ये केलेली असल्यामुळे या संघर्षांला वेगळे वळण लागले आहे. मुंडे समर्थकांनी मात्र पंकजा मुंडेच्या आवाजातील क्लिप मोडून तोडून दाखविल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत. गडावर दर्शनासाठी येण्यासाठी कोणालाही प्रतिबंध नाही. मात्र राजकीय भाषण होणार नाही, या भूमिकेवर शास्त्री ठाम आहेत.