ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे मुंडे आणि युतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांच्यातील वैर भाजपाच्या महाजनादेश यात्रेतच चव्हाट्यावर आले. महाजनादेश यात्रा सोमवारी बीड जिल्ह्यात दाखल झाली. यात्रा दुपारी बीड शहरात आल्यानंतर आमदार विनायक मेटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रथात चढले. मेटे येताच दोन्ही मुंडे भगिनी रथातून खाली उतरतून निघून गेल्याने सर्व काही आलबेल नसल्याचा प्रत्यय उपस्थितांना आला.

शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद नवा नाही. लोकसभा निवडणुकीतही मेटे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर महाजनादेश यात्रेत घडलेल्या प्रसंगाने मुंडे भगिनी आणि मेटे यांच्यातील राजकीय वाद कायम असल्याचे दिसून आले. भाजपाची दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा सोमवारी बीड जिल्ह्यात आली. जामखेडनंतर ही यात्रा बीड शहरात दाखल झाली. यात्रेच्या रथात पंकजा मुंडे या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्यासह उपस्थित होत्या. शिवसंग्रामवतीने अहमदनगर-बीड रोडवरील काकडहिरा येथे स्वागताची तयारी करण्यात आली होती. स्वागताच्या ठिकाणी यात्रा पोहचल्यानंतर विनायक मेटे यांनी रथावर चढून मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. यावेळी मेटे रथावर येताच पंकजा मुंडे व प्रितम मुंडे रथातून खाली उतरल्या आणि बीडमधील सभेच्या ठिकाणी निघून गेल्या.

बीडमध्ये महाजनादेश यात्रेची जाहीर सभा झाली. या सभेत पंकजा मुंडे यांनी विनायक मेटे यांचा नामोल्लेख टाळत टीका केली. पंकजा मुंडे म्हणाल्या, मुख्यमंत्री साहेब स्व. मुंडे साहेब गेल्यानंतर तुम्ही माझे गुरू आहात. तुमचा देवेंद्र ते नरेंद्र हा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. द्रोणाचार्यांनी अर्जुनापेक्षा कुणी वरचढ ठरू नये म्हणून एकलव्याचा अंगठा मागितला होता. मात्र तो अंगठा अर्जुनासाठी होता. तुमच्यासाठी मी एकलव्य होऊन अंगठा द्यायला तयार आहे. पण फक्त तो अर्जुनासाठी असावा दुसऱ्यांसाठी नाही, असे सांगत पंकजा यांनी मेटेंचा समाचार घेतला. महाजनादेश यात्रेदरम्यान घडलेल्या या घटनेने मुंडे-मेटे वैर शमले नसल्याचेच दिसून आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या वादावर तोडगा काढण्याचे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर असणार आहे.