ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. शिवसेनेनंही त्यांना पक्षात येण्याचं आवाहन केलं होतं. पण, भगवान गडावरून दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

पंकजा मुंडे म्हणाल्या,”दसरा मेळाव्यानिमित्त ऑनलाईन मेळावा असूनही राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक भगवानगडावर आले आहेत. आज माझ्याकडे कोणतंही पद नसताना लोक आले. निवडणुकीनंतर काही लोकांना वाटलं पंकजा मुंडे संपल्या. ज्यांना मी संपले असं वाटत होतं, त्यांनी ही जनसंपत्ती जरूर पाहावी, असा टोला पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला.

“मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे. आता राष्ट्रीय मंत्री झाली आहे. पक्षाच काम देशाच्या पातळीवर करणार असल्याचं पंकजा म्हणाल्या. तुम्ही धीर सोडू नका, कुठलाही व्यक्ती पक्षापेक्षा मोठा होऊ शकत नाही. पक्षाचा विचार मोठा असतो, पण गोपीनाथ मुंडेसाहेब हे पक्षापेक्षा मोठे झाले, त्यांचं नाव पक्षातलेच नाही तर विरोधपक्षातले लोकंही घेतात,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

“पहिले मी वाट्टेल तेवढा निधी द्यायचे. निधीच्या रुपात पैशांचा पाऊस पाडला. आता रस्त्यावर उतरुन आम्ही सरकारला जाब विचारणार. या सरकारचं चांगल्या कामांचं कौतुक करण्याचं धारिष्ट्य गोपीनाथ मुंडेंच्या कन्येत आहे. त्याचप्रमाणे या सरकारला जाब विचारण्याचं धारिष्ट्यदेखील आहे. हे धारिष्ट्य तुम्हा सगळ्यांच्या बळावर आहे. माझं जीवनच तुम्हाला अर्पण आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“मुंडे साहेब जिल्हा परिषदेलाही उभे नव्हते. भाजपाचं सरकार येईल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, तेव्हा मुंडे साहेबांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली. तेव्हा मित्रांसोबत बसून, मी शिवाजी पार्क भरुन सभा घेणार, असं बोलले होते. मुंडे साहेबांच्या संघर्ष यात्रेचा समारोप शिवतीर्थावर झाला. त्यामुळे शिवतीर्थावर एक दिवस मी सभा घेतल्याशिवाय राहणार नाही”, असा निर्धार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.