चंद्रकांत पाटील यांच्याकडून खंडन

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत प्रसारमाध्यमातून होणाऱ्या पक्षांतराच्या चच्रेनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा यांच्या पक्षांतराचे वृत्त अफवा असून त्या पक्षाबरोबरच राहणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र पंकजा यांनी याबाबत मौन बाळगल्याने पक्षांतर्गत नेतृत्वाच्या स्पध्रेत आपले पाय मजबूत करण्यासाठीचाच हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीही पक्षांतर्गत प्रक्रियेतून दुर्लक्षित केले जात असताना दोन वेळा बंडाचे निशाण फडकावले होते.

पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर समाजमाध्यमातून आपला पराभव अनेकांना हवा होता म्हणून झाला असावा, अशा शब्दांत अंतर्गत खदखद व्यक्त केली होती. सत्तांतराच्या नाटय़ात अपवादानेच दिसलेल्या पंकजा यांनी रविवारी समाजमाध्यमातून प्रसारित केलेल्या मजकुरामुळे नेहमीप्रमाणे गोंधळ उडाला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या जयंती कार्यक्रमाला निमंत्रण देताना पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे? असे प्रश्न उपस्थित करून ‘मावळे येतील.’ असा विश्वास व्यक्त केल्याने पक्षांतर्गत गटबाजीतून पंकजा वेगळा राजकीय निर्णय घेतील असे कयास बांधण्यास सुरुवात झाली. समाजमाध्यमातून पंकजा समर्थकांनी थेट शिवसेनेत जाण्याच्या इच्छा व्यक्त केल्याने माध्यमातून पंकजा मुंडे खरेच पक्षांतर करणार का? यावर चर्चा सुरू झाली.

चर्चा निर्थक – पाटील

भाजपच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या पंकजा मुंडे या अन्य राजकीय पर्यायाबाबत विचार करत असल्याची चर्चा निर्थक असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

पंकजा मुंडे भाजपशिवाय अन्य काही विचार करतील अशी चर्चा दोन दिवसांपासून सुरू आहे. अपघाताने आलेल्या सरकारचे मनातले मांडे खाणे सुरू आहे. अशा प्रकारच्या बातम्यांचा कुठलाही अर्थ नाही. पंकजा मुंडे यांच्याशी आमचे बोलणे झाले आहे. त्या टप्प्याने या स्तरावर पोहोचल्या आहेत. त्या असा कोणताही विचार करू शकत नाहीत. या अफवा आणि बातम्या थांबाव्यात, यासाठी  प्रदेशाध्यक्ष म्हणून मी बाजू मांडत आहे. पराभवानंतर कुठल्याही नेत्याची मानसिकता असते की आपले काय चुकले, आपण आत्मपरीक्षण करायला हवे. ती मानसिकता म्हणजे त्या वेगळा विचार करत आहेत असे नाही.

अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात

पंकजा मुंडे या शिवसेनेत जाणार अशी चर्चाही सुरू झाल्यानंतर त्याबाबत माध्यमांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे विचारणा केली असता, अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांची नावे आता सांगणार नाही. पंकजा मुंडे यांचा निर्णय १२ डिसेंबरला कळेल, असे विधान राऊत यांनी केले.