नाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. एवढंच नाही तर हिंमत असल्यास बीडची लोकसभा निवडणूक लढवा, उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. अर्ज भरा आणि खुशाल मैदानात या असं खुलं आव्हानच पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंनी दिलं आहे. स्वतः मागच्या दारानं यायचं आणि लोकांना पुढे करायचं, हे बीडची जनता कधीच सहन करणार नाही असाही टोला पंकजा मुंडेंनी लगावला.

राष्ट्रवादीला त्यांच्याच पायगुणाने वाळवी लागली. आधी पाच आमदार होते, जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात राजकारण केलं.ते आज त्यांच्या मंचावर नाहीत. विमलताई मुंदडा गटदेखील नाराज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं काय ये अंदर की बात है, पुरी राष्ट्रवादी हमारे साथ है असंही वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं आहे. १९ मार्चला धनंजय मुंडे यांनीही पंकजा मुंडेंवर टीका करत आता धनूदादा अशी हाक ऐकू येत नाही असं म्हटलं होतं. आता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेचं नाव न घेता, नाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.