महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपातील अंतर्गत वाद अधिक तीव्र झाले. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे आपली प्रदेश पक्षनेतृत्वावरील नाराजी व्यक्त केली. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे उद्या (१२ डिसेंबर) कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गोपीनाथ गडावर हा मेळावा होणार असून याच दिवशी परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या मेळाव्याच्या पोस्टरवरून कमळ हद्दपार झाल्याचे दिसून आले होते, मात्र अवघ्या तीन तासात पोस्टरवर कमळ परत झळकल्याचे दिसून येत आहे.

भाजपामधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपली नाराजी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. या साऱ्यामध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याकडे…

पंकजा मुंडेंच्या पोस्टरवरून कमळ गायब! समर्थकांच्या मनात नेमकं काय?

गोपीनाथ गडावरील मेळाव्यात त्या कोणती वाट निवडणार याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याला अवघा एक दिवस उरला आहे. त्यामुळे सकाळीच संपूर्ण परळीत मेळाव्याचे पोस्टर लावण्यास सुरूवात झाली होती. या मेळाव्याच्या पोस्टरवरून भाजपा आणि कमळ गायब असल्याचं चित्र दिसत होते. पंकजांच्या पोस्टर्सवर कुठेही भाजपाचे नाव किंवा कमळाचे चिन्ह दिसत नव्हते. मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेदेखील अद्याप लावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे पंकजा मुंडे खरंच वेगळा मार्ग निवडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण अवघ्या तीन तासांतच भाजपा आणि कमळाचे चिन्ह असलेले पोस्टर्स परळीत झळकले.

कमळ चिन्ह नसलेले पोस्टर्स

 

कमळ चिन्हासह झळकलेले पोस्टर्स

 

‘तुम्ही नाराज आहात का?’ यावर ‘इतके दिवस थांबला आहात, तर आणखी एक दिवस थांबा’ असे उत्तर पंकजा मुंडे यांनी दिले होते. तर ‘गोपीनाथ गड हे राजकीय व्यासपीठ नाही, त्यामुळे कमळ किंवा भाजपाचे नाव लिहिण्याचा प्रश्नच येत नाही’, असे उत्तर खासदार प्रीतम मुंडे यांनी दिले होते.

त्यानंतर आता उद्याच्या मेळाव्याचे पोस्टर्स कमळासहित झळकल्यामुळे पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश आले आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.