08 December 2019

News Flash

तुम्ही आयुष्यभर मोर्चे काढा, आम्ही सत्तेतून कामे करू

अंबाजोगाई तालुक्यातील सोयाबीनच्या पिकाला कंपनीने विमा मंजूर करण्यापासून वगळले होते.

मंत्री पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

बीड : सरकार निर्णय घेणार हे लक्षात येताच राष्ट्रवादीचे नेते मोर्चे काढून निर्णय झाला की, आमच्या आंदोलनाला यश आल्याचे पत्रक काढून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न करतात. जनतेचे प्रश्न आम्ही पाठपुरावा करुन सोडवतो, सरकार निर्णय घेते. हे सामान्य जनतेला कळते. त्यामुळे तुम्ही आयुष्यभर विरोधात राहून मोच्रे काढा आम्ही सत्तेत राहून जनतेची कामे करत राहू, असा टोला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट नामोल्लेख टाळून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना लगावला. सोयाबीनच्या पीक विमा मंजुरीवरुन मुंडे बहीण भावामध्ये पत्रक श्रेयवाद रंगला आहे.

बीड जिल्ह्यातील परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील सोयाबीनच्या पिकाला कंपनीने विमा मंजूर करण्यापासून वगळले होते. इतर नऊ तालुक्यात सोयाबीनच्या पिकाला विमा मंजूर झालेला असताना दोन तालुक्यालाच वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. अखेर कंपनीने परळीसाठी हेक्टरी २९ हजार ७५९ रुपये तर अंबाजोगाई तालुक्यासाठी हेक्टरी ३३ हजार ८४९ रुपये नुकसान भरपाई मंजूर केली. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजपकडून श्रेयाचे पत्रकवार सुरू झाल्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलेच फटकारले. पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी विविध योजना आपण आणल्या. विकासकामे पूर्ण केली आहेत. आयुष्यमान भारत योजना, उज्ज्वला गॅस, स्वच्छतागृह, घरकूल ही त्याची उदाहरणे आहेत. तर परळी शहरात विशेष रस्ता अनुदानातील साठ लक्ष रुपयांच्या रस्त्याचे लोकार्पण होत आहे. मात्र सरकार निर्णय घेणार हे लक्षात येताच राष्ट्रवादीचे नेते मोच्रे, आंदोलने करुन निर्णय झाला की आपल्याच आंदोलनाचे यश असे पत्रक काढून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. मात्र जनतेला सर्व कळते, त्यामुळे विरोधकांनी आयुष्यभर मोच्रे काढत रहावे आम्ही सत्तेत राहून जनतेची कामे करू असा टोला थेट नामोल्लेख न करता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना लगावला. विमा मंजूर होताच धनंजय मुंडे समर्थकांनी पत्रक काढून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन सातत्याने पाठपुरावा केला. यामुळेच विमा मंजूर झाला, असा दावा केला होता. तर पालकमंत्री आपल्या पाठपुराव्यामुळे विमा मंजूर झाल्याचे सांगत असतील तर इतर तालुक्यांबरोबर या दोन तालुक्यांना तेव्हाच मंजुरी का मिळाली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे या पत्रकावरुन मंत्री मुंडे यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.

First Published on August 15, 2019 3:07 am

Web Title: pankaja munde hit dhananjay munde over credit crop insurance zws 70
Just Now!
X