गेल्या काही दिवसांत भ्रष्टाचार आणि दुष्काळग्रस्त भागातील सेल्फीच्या मुद्द्यावरून लक्ष्य करणाऱ्या विरोधकांना पंकजा मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी सर्वप्रथम स्वत:चे तोंड आरशात पाहावे. मी त्यांच्याविरुद्ध तोंड उघडायचे ठरवले तर त्यांना पळता भुई थोडी होईल, अशा तिखट शब्दांत पंकजा यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. त्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पंकजा यांनी धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केले. मी मंत्री झाल्यापासून दोन वर्षात कुणाच काय वाकडे केले? मनात आणले असते तर मी सहजपणे तसे करू शकले असते. रक्ताच्या नात्याशी प्रतारणा करणाऱ्यांचे घोटाळे मी बाहेर काढले तर त्यांना तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही. सध्या कोण कोणाच्या खुंटीला बांधलेले आहे हे सर्वांना माहिती असल्याने धर्म अधर्माच्या या लढाईत श्रीकृष्णरूपी जनतेने योग्य निर्णय घेत आपल्या पाठीशी उभे राहावे, असे पंकजा यांनी सांगितले.