चिक्की घोटाळ्याचा वाद शमतो न शमतो तोच राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा नव्या वादात सापडल्या आहेत. दुष्काळी भागाच्या दौऱयावर असताना पंकजा मुंडे यांनी स्वत:च्या चपला सरकारी कर्मचाऱयाला उचलायला लावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. यासंबंधीची दृश्ये अनेक वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्याने मुंडे पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी सापडल्या आहेत.
पंकजा मुंडे यांनी नुकताच परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यात पावसामुळे चिखलमय झालेल्या एका रस्त्यावरून जात असताना पंकजा यांच्या पायातील चप्पल गाळात अडकली. त्यानंतर त्यांची चप्पल सोबतच्या कर्मचाऱ्याने हातात घेतली आणि तो त्यांच्या मागे चालू लागला.
हे दृश्य एका वृत्तवाहिनीने टिपले आणि ते प्रसिद्ध होताच विरोधकांनी पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे.
शेतकऱयांचे भले करण्याचा दावा ठोकणाऱया या सरकारचा नुसता देखावा आहे. जे मंत्री स्वत:ची चप्पल एखाद्या सामान्य गरीब माणसाला उचलायला लावतात, ते शेतकऱ्यांचे काय भले करणार, असा सवाल काँग्रेसतर्फे उपस्थित करण्यात आला. दरम्यान, आपण काढलेली चप्पल कोणीतरी उचचली आहे, याची कल्पना देखील आपल्याला नव्हती, अशी सारवासारव पंकजा यांनी केली आहे. तसेच चप्पल उचलणारा सरकारी कर्मचारी नसून, तो आपला खासगी कर्मचारी असल्याचे स्पष्टीकरण देखील पंकजा यांनी दिले आहे.