पंकजा मुंडेंची अजित पवारांकडे तक्रार

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री असून रेमडेसिविरच्या काळ्याबाजारामुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे. जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सकांकडे या समस्यांचे उत्तर नाही. डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या घेऊन इंजेक्शन देण्यात आल्याचे दाखवण्यात आले असले तरी ते रुग्णांनाच काय तर डॉक्टरांनाही मिळाले नाहीत. दहशतीच्या वातावरणामुळे डॉक्टर व्यक्त होत नाहीत. विशिष्ट पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते स्वत:च्या कार्यालयातून इंजेक्शन वाटप करत असल्याचे सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट पत्र लिहून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कारभाराचीच तक्रार केली आहे.

बीड जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवण्याबाबत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लेखी पत्र देऊन राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कारभाराचीच तक्रार केली आहे. पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपात कोणीही गैरव्यवहार करू नये. कोणीही केला तरी तो चुकीचा आहे असे सांगितले होते. याची आठवण करून देत बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पालकमंत्री असताना विपरीत व्यवहार होत असल्याचा आरोप केला आहे. रेमडेसिविर इंजेक्शनमुळे जिल्ह्यात प्रचंड असंतोष आहे. जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक यांच्याकडे उत्तर नाही. अनेक डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या घेऊन इंजेक्शन देण्यात आल्याचे दाखवले तरी ते रुग्णांनाच काय तर डॉक्टरांनाही मिळाले नाही. जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक यांच्यावर प्रचंड दबाव असल्यासारखे त्यांचे वर्तन असून आपण जातीने लक्ष घालून जनतेला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नागरिकांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न असल्याने कोणतेही औषध, लस, उपचार कोण्या पक्षाची, वर्गाची मक्तेदारी नाही, असे सुचवत थेट पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कारभाराची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रारच केली आहे.