सध्या मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. मात्र, वर्षानुवर्षे सत्ता भोगणाऱ्यांनीच मराठा तरूणांचे नुकसान केले. त्यांना इतके वर्ष न्याय देण्यात का आला नाही, असा सवाल उपस्थित करत पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर आसूड ओढले. त्या मंगळवारी भगवानगडाच्या पायथ्याशी दसऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होत्या. पूर्वी शेतकरी, कष्टकरी यांचे मोर्चे निघायचे, आता जातीवर आधारित मोर्चे निघत आहे. मोर्चा काढण्याची वेळ का आली विचार होण्याची गरज असल्याचे यावेळी पंकजा यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्यातील वाद टिपेला पोहचला आहे. या वादाचे कारण पुढे करत प्रशासनाने पंकजा मुंडे यांना भगवान गडाऐवजी पायथ्यशी सभा घेण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर पंकजा आज काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, ज्या गडाला मी बाप मानलंय त्यांच्याविरोधात बोलणार नाही, असे सांगत पंकजा यांनी नामदेवशास्त्रींवर थेट टीका करण्याचे टाळले. या दसऱ्याला मला त्रास दिला, पण पुढील दसऱ्याला या गडाच्या गादीवर बसलेले महंत मला कन्या म्हणून सन्मानाने गडावर बोलवितील असा विश्वासही यावेळी पंकजा यांनी व्यक्त केला. राजकारणात काहीजणांकडून माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला. गडावर आम्हाला दहशतवादी असल्यासारखी वागणूक मिळाली. तरीही मी अहंकार आणि कारस्थानाचा बुरूज उतरून तुमच्यापर्यंत आले. जोपर्यंत जनतेचे पाठबळ आहे तोपर्यंत मी कोणालाही घाबरणार नाही, असे पंकजा यांनी सांगितले.
तत्पूर्वी भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे गडाच्या पायथ्याशी असलेल्या सभास्थानी रवाना झाल्या. यावेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. यापैकी काही समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला. मात्र, पंकजा मुंडे यांनी समर्थकांना शांत होण्याचे आवाहन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी, सदाभाऊ खोत, रासपचे महादेव जानकर यांनी भाषण करून पंकजा यांच्या पाठिशी आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले.
पंकजा मुंडेंनी घेतले भगवानबाबांचे दर्शन, नामदेव शास्त्रींची भेट टाळली
भगवानबाबांच्या जवळ असलेल्या दलालांना आम्ही मानत नाही. कोण येऊन याठिकाणी भगवानबाबाचा गड माझा म्हटला तरी गय करणार नाही, असे सांगत सदाभाऊ खोत यांनी नामदेवशास्त्री यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे याच बहुजन समाजाच्या नेत्या असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.