‘सेल्फी’वादाची पाश्र्वभूमी; पंकजा यांच्याकडून मात्र सारवासारव

लातूरच्या दुष्काळ दौऱ्यावर असताना ‘सेल्फी’ काढल्याने टीकेच्या धनी ठरलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली. पंकजा यांनी मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

लातूरच्या दुष्काळ दौऱ्यावर गेलेल्या पंकजा मुंडे यांनी रविवारी मांजरा नदीवरील साईबंधारा येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी तिथे बंधाऱ्यात पाणी असल्याचे पाहून त्यांनी या बंधाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर मोबाइलमध्ये ‘सेल्फी’ काढला. मुंडे यांच्या या सेल्फीमुळे वादाचे मोहोळ उठले. सत्ताधारी भाजप दुष्काळाबाबत गंभीर नाही, अशी टीका विरोधकांनी सुरू केली. पंकजा यांची कृती म्हणजे फडणवीस सरकारच्या सध्या सुरू असलेल्या दुष्काळ पर्यटनाचाच एक भाग असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी केली. तर शिवसेनेनेही पंकजा यांची ही कृती दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारचे सेल्फी काढण्याचा मोह सरकारात जबाबदार पदावर असलेल्यांनी टाळायला हवा, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. दुष्काळी प्रदेशातील महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत असतानाच महिला मंत्र्याने अशा प्रकारचा सेल्फी काढणे हा दुष्काळग्रस्तांचा अवमान असल्याची टीकाही शिवसेनेने केली.

या सर्व वादाच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला पंकजा मुंडे यांनी दांडी मारली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पंकजा बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले आहे.

लातूर दौऱ्यात पाणीटंचाईबाबत बैठका झाल्या. चर काढून पाणी उपलब्ध करण्याचे ठरले. साईबंधारा, मांजरा नदीवर सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना तेथे पाणी बधून समाधान वाटले. मी आनंदाने कामाची छायाचित्रे काढली व चित्रीकरण केले. मात्र, काहींनी त्याचा विपर्यास केला.

– पंकजा मुंडे, ग्रामविकासमंत्री