आधी भगवानगड… त्यानतंर गोपीनाथ गड आणि आता सावरगाव…ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या राजकारणाचं नव शक्तीस्थान असणार आहे. पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील संघर्षांनंतर गेल्या वर्षी सावरगाव घाट(ता.पाटोदा) येथे स्थलांतरीत केलेल्या ‘दसरा’ मेळाव्याला यावेळी कसा प्रतिसाद मिळतो याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. हा मेळावा राजकीय विरोधाबरोबरच पक्षांतर्गत नेतृत्व स्पर्धेत प्रभाव टाकणारे ‘शक्तीपीठ’ व्हावे यासाठी गर्दीचा उच्चांक मोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऊसतोड मजुरांच्या संपावर या मेळाव्यातून तोडगा काढून राज्यभरातील ऊसतोडणी मजूर व वंजारी समाजाचे नेतृत्व सिध्द करण्याची संधी साधली जाईल, असे मानले जात आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा, नागपुरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विजयादशमी आणि  मुंडेंचा भगवानगडावरील दसरा मेळावा आज होणार आहे. पंकजा मुंडेंनी गडाच्या मेळाव्यातूनच राज्यभर आपला प्रभाव निर्माण केल्यानंतर जवळपास १०० विधानसभा मतदारसंघांत मुंडे राजकीय ताकद निर्माण करण्यात यशस्वी ठरले. गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनानंतर मुलगी पंकजा मुंडे यांनी पुन्हा संघर्ष यात्रा काढून राज्यभरातील मुंडे समर्थकांची मोट बांधली. विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा झाल्याने पंकजा या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांतून झाला. तर पंकजा यांनीही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून आपली इच्छा लपून ठेवली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत नेतृत्वाच्या स्पर्धेचा त्यांनाही सामना करावा लागल्याचे काही घटनांमधून समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा यांच्याकडील जलसंधारण खाते काढल्यानंतर ही अंतर्गत बाब प्रकर्षांने जाणवली. या पाश्र्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला महत्व आले आहे.

पहिल्या वर्षी गडाच्या पायथ्याला मेळावा घेतल्यानंतर गेल्या वर्षी संत भगवानबाबांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे मेळावा स्थलांतरीत करत दोन दिवसांत गर्दी जमवून समाजावरील आपली पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले. पंकजा  मुंडे यांनीही समाजमाध्यमातून ‘आपली परंपरा भक्ती आणि शक्तीचा संगम’ अशी साद घालत मेळाव्याला येण्याचे आवाहन केल्यामुळे यावर्षीचा मेळावा नेमका कसा होतो आणि मुंडे काय बोलतात याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, गड काढून घेणाऱ्यांना समाज काढून घेता आला का याचं उत्तर येणाऱ्या दसरा मेळाव्यातून मिळणार आहे. 2019 च्या निवडणूक वर्षाच्या दृष्टीनं ते उत्तरच पंकजा मुंडेंच्या राजकारणाची दिशा आणि दशा ठरवणार आहे.