राज्यातील रस्ते घोटाळ्याचा विषय विरोधकांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित केल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधक कोणतेही पुरावे न देता बिनबुडाचे आरोप करीत आहेत आणि विधानसभेत मिळणाऱ्या विशेषाधिकारांचा वापर करत आहेत, असे म्हटले. त्याचवेळी पंकजा मुंडे यांच्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंकजा मुंडे यांच्यावर विरोधकांकडून होणारे आरोप फेटाळून लावताना देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक रुप धारण केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्ही सर्व कागदपत्रे समोर ठेवली आहेत. तरीही सरकार ऐकून घेत नसल्याचा आरोप केला. त्यावर फडणवीस यांनीही केवळ विधानसभेत केलेल्या आरोपांना न्यायालयात आव्हान देता येत नाही. म्हणून विरोधक सभागृहात बिनबुडाचे आरोप करत आहेत. हे सभागृहाला शोभणारे नसल्याचे सांगितले.
दरम्यान, पंकजा मुडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. गेल्या दीड वर्षापासून विरोधकांकडून मला सातत्याने लक्ष्य करण्यात येत असून खोटे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे काही वेळ खूप निराशा येते. पण मी मागे हटणार नाही. मी लढा देऊन पुढे जाणार, असा निर्धार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.