संघर्षांने पंकजा मुंडेंचेच नेतृत्व बळकट

महंत नामदेव शास्त्री यांच्या प्रखर विरोधानंतर पंकजा मुंडे यांनी मागच्यावर्षी भगवानगडाच्या पायथ्याला दसरा मेळावा घेऊन ‘माधवं’ चा राजकीय प्रभाव कायम ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यावेळी लाखो लोकांची मागणी आणि भाजप सरकारमधील प्रमुख मंत्री असतानाही प्रशासनाने मेळाव्याला परवानगी नाकारलीच कशी, नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी उघडपणे विरोधाची भूमिका कोणाच्या इशाऱ्यावरुन घेतली, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच भाजपला सत्ता मिळाल्याचे जाहीरपणे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गप्प कसे, या प्रश्नांमुळे ‘माधवं’ चे दसरा मेळावा हे राजकीय शक्तीपीठ खिळखिळ करण्याच्या षडयंत्राला विरोधी पक्षाबरोबरच भाजपातूनही बळ दिले जात असल्याचा उघड आरोप केला जात  आहे. अशा परिस्थितीतही एक दिवस अगोदर स्थळ बदलून पंकजा यांनी मेळावा यशस्वी करुन समाजावरील पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले. माळी, धनगर व वंजारी असा जात समूह भाजपच्या बाजूने वळविण्यासाठी हे सारे सुरू आहे.

संत भगवानबाबा यांनी स्थापन केलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाला मानणारा मोठा भक्त गण आहे. दसऱ्याला विचारांचे सीमोल्लंघन करण्याची या गडावर परंपरा आहे. मागील काही वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्याची परंपरा रुढ झाली. मुंडे यांनी भगवानसेनेच्या माध्यमातून राज्यभर वंजारा समाजाचे संघटन बांधतांना ‘माधवं’ चा प्रयोग यशस्वी करुन दसरा मेळावा हे राजकीय शक्तीपीठच झाले. मेळाव्याला ओबीसींचे नेते छगन भुजबळ, रासपचे महादेव जानकर, छत्रपती संभाजी महाराज, तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर, शेतकरी संघटनेतील सदाभाऊ खोत, राजू शेट्टी आणि खासदार रामदास आठवले यांना गडावर निमंत्रित करुन राजकीय प्रभाव निर्माण केला. दरवर्षी गडावरुन दिवंगत मुंडे सामाजिक आणि राजकीय संदेश देत असल्याने राज्यभरातील शंभर विधानसभा मतदारसंघात मुंडेंचा प्रभाव निर्माण झाला. परिणामी सत्ता नसली तरी मुंडेंचा राजकीय दबदबा कायम राहिला. भाजप अंतर्गत नेतृत्वाच्या स्पर्धेतही मुंडेंनी ‘माधवं’ च्या माध्यमातून आपले नेतृत्व प्रस्थापित केले. शिवसेनेचा मुंबईतील तर भगवानगडावरील मुंडेंचा मेळावा कायम चच्रेत राहिला. दिवंगत मुंडे यांच्यानंतर गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना गडाची कन्या जाहीर करुन समाजाचे नेतृत्व बहाल केले. पंकजा मुंडे यांनीही संघर्ष यात्रा काढून जवळपास ८० मतदारसंघातील माधवं ची ताकद भाजपच्या पाठीमागे उभी केली. सत्तांतरानंतर पंकजा यांना मंत्री म्हणून चार खात्यांची जबाबदारी मिळाली. मात्र गोपीनाथगडाची निर्मिती झाल्यानंतर महंत शास्त्री यांनी भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या भाषणबंदीचा निर्णय जाहीर केला आणि वादाला सुरुवात झाली. भाजपचे सरकार, प्रमुख मंत्री असतानाही मागच्यावर्षी ऐनवेळी गडावर मेळाव्याला परवानगी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पायथ्याला मेळावा यशस्वी केला. मंत्री महादेव जानकर, मंत्री राम शिंदे, खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आदिंच्या उपस्थितीत ‘माधव’ चा प्रभाव कायम असल्याचे दाखवून दिले. गडावरील कट कारस्थानाचा बुरुज उतरुन मी खाली आल्याचे सांगत पुढच्या वर्षी सन्मानाने महंत बोलवतील व मेळावा होईल असा विश्वास पंकजा यांनी व्यक्त केला होता. मात्र, वर्षभरानंतरही महंत आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पुन्हा वाद सुरू झाला. राज्यभरातील लाखो लोकांनी एक सुरात गडावर मेळावा घेण्याची मागणी लावून धरली. भाजप सरकारमध्ये पंकजा प्रमुख मंत्री आहेत, असे असताना नगर जिल्हा प्रशासनाने मेळाव्याला परवानगी नाकारलीच कशी, असा प्रश्न उपस्थित झाला. पुढच्या वर्षी मेळाव्याची पूर्ण तयारी करू, काहीही त्रास होणार नाही असे जाहीर केले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राज्यस्तरावरील ओबीसींचे नेते छगन भुजबळ कारागृहात आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पंकजा या एकमेव ओबीसींचा आश्वासक चेहरा मानला जात आहे. दिवंगत मुंडे यांच्या प्रमाणेच पंकजा मुंडे यांनीही भाजपात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षांतर्गत नेतृत्वाच्या स्पर्धेत वर्षभरापूर्वी त्यांच्याकडील जलसंधारण खाते काढून प्रा.राम शिंदे यांना देण्यात आले.  नव्याने निर्माण केलेल्या ओबीसी मंत्रालयाचा पदभारही शिंदे यांनाच देण्यात आला. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाचे वाढते प्रस्थ नियंत्रित करुन ‘माधवं’ ची राजकीय शक्ती कमी करण्यासाठी  दसरा मेळाव्याला खिळ घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याने ओबीसी घटकातून अस्वस्थता व्यक्त केली जात आहे.