पालकमंत्र्यांसह भाजपचा एकही आमदार, पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतास नाही!

भाजप महायुती घटक पक्षातील शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या सामुदायिकविवाह सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतील की नाही, याची उत्सुकता रविवारी सकाळपर्यंत कायम असताना अखेर दुपारी मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचा एकही आमदार, पदाधिकारी फिरकला नाही. पालकमंत्री मुंडे आणि आमदार विनायक मेटे यांच्यातील अंतर्गत राजकीय वादातून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतावरही स्थानिक भाजपने अप्रत्यक्षपणे बहिष्कारच टाकल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्य़ात भाजपच्या पालकमंत्री मुंडे, खासदार प्रितम मुंडे व ३ आमदार आहेत. यातील कोणीही या कार्यक्रमाकडे फिरकले नाही.

पालकमंत्री मुंडे आणि महायुतीतील घटक पक्ष शिवसंग्रामचे आमदार मेटे यांच्यातील राजकीय वाद आता सर्वश्रृत झाला आहे. मागील महिन्यात श्री क्षेत्र नारायणगडावर आमदार मेटे यांनी आयोजित केलेल्या द्विशताब्दी पुण्यतिथी सोहळ्यास मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर निमंत्रित होते. मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा आल्यानंतरही ऐनवेळी मुख्यमंत्र्यांसह भाजपचा एकही आमदार आणि पदाधिकारी कार्यक्रमाकडे फिरकला नाही.

या पाश्र्वभूमीवर मेटे यांच्या पुढाकारातून रविवारी आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री हजेरी लावणार का, पालकमंत्री मुंडे स्वागतास थांबणार का, याची उत्सुकता होती. अखेर दुपारी दीडच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस यांचे अंबड (जिल्हा जालना) येथून आगमन झाले. मुख्यमंत्री थेट पालवण येथील छावणीत उभारण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या मंचावर आले आणि विवाहानंतर परत जालन्याकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांसह पक्षाचे नेते जिल्ह्यात आले असताना पालकमंत्र्यांसह भाजपचा एकही आमदार, पदाधिकारी त्यांच्या स्वागतास फिरकला नाही. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या व्यासपीठावरही भाजपचा एकही पदाधिकारी, कार्यकर्ता नव्हता. मंत्री मुंडे व आमदार मेटे यांच्यातील राजकीय सौख्याचा फटका थेट मुख्यमंत्र्यांनाही बसल्याचे लपून राहिले नाही. मेटे यांनी व्यासपीठावरून अप्रत्यक्षपणे पालकमंत्री मुंडे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीस येणार का नाही,  याबाबत शेवटपर्यंत कार्यकत्रे प्रशासनाला विश्वास नव्हता. मात्र, ‘अनेक अडचणी असताना’ फडणवीस येणार याचा आपल्याला विश्वास होता. कारण फडणवीस हे दिलेला शब्द पाळतात, हा त्यांचा लौकिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी मात्र आपल्या भाषणात पालकमंत्री मुंडे या लातूर व बीड जिल्ह्यात सक्षम काम करीत असल्याचे सांगितले. स्थानिक भाजपचा प्रखर विरोध असतानाही मेटे हे मुख्यमंत्री फडणवीस यांना आणण्यात यशस्वी झाल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.