वसंत मुंडे

माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून परळी तहसीलमधून कागदपत्रांची जमवाजमव सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून पंकजा यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पंकजा यांनी गोपीनाथ गडावरील मेळाव्यात पक्षाच्या कोअर कमिटीचा राजीनामा देत नाराजी व्यक्त केली होती. या निवडणुकीत पक्षाने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे परळीला आणखी एक आमदार मिळणार असून, विधीमंडळात पुन्हा मुंडे बहिण-भावात राजकीय सामना रंगताना दिसू शकेल. फक्त भूमिकांची अदलाबदल झालेली पहायला मिळू शकते. याबाबत चर्चा असली तरी पंकजा मुंडे यांनी मात्र तूर्तास याचा इन्कार केला आहे.

महाराष्ट्र राज्य विधानपरिषद ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. भाजपा ३ ते ४ जागा जिंकू शकते. यासाठी पक्षाने ओबीसी ‘फायर ब्रँड’ नेत्या पंकजा मुंडे यांची उमेदवारी निश्चित केल्याचे संकेत आहेत. पंकजा मुंडें यांच्याकडून उमेदवारी भरण्यासाठी परळी तहसील कार्यालयातून आवश्यक कागदपत्रे मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपापासून दुरावलेल्या ओबीसी समूहाला जोडण्यासाठी पंकज यांच्याकडे काही दिवसातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही दिले जाण्याची शक्यता समर्थकातून व्यक्त केली जात आहे.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापना झाले आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांची सामाजिक न्याय मंत्रीपदी नियुक्ती झाली. कौटुंबिक कलहानंतर राजकीय पातळीवर कट्टर विरोधक असलेले धनंजय मुंडे यांनी मतदारसंघही ताब्यात घेतला सत्तेत संधी मिळाल्याने जिल्ह्याची धुराही त्यांच्याकडे गेली. त्यामुळे पंकजा समर्थकांडून त्यांच्या पक्षाने विधानपरिषदेवर घेऊन पुनर्वसन करावे अशी मागणी केली होती.

दोन दिवसांपासून पंकजा मुंडे यांच्याकडून परळी तहसीलमधून विधान परिषदेवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव केली जात असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी विजय मिळाल्यानंतर, राजकीय पकड मजबूत करण्यासाठी धनंजय यांनी निवडणुकीत दिलेले शब्दाप्रमाणे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे चिरंजीव काँग्रेसचे संजय दोंड यांना रिक्त झालेल्या विधान परिषद जागेवर संधी दिली. यामुळे पहिल्यांदाच परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून तिसरा आमदार मिळण्याची शक्यता आहे. तर पुन्हा एकदा विधिमंडळात धनंजय विरुद्ध पंकजा हा सामना रंगणार असून फक्त दोघांच्या भुमिका बदलली असतील इतकेच.

पंकजा मुंडेंनी केलं वृत्ताचं खंडन

“कोणाच्याही उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्टीकडून कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. सर्व संभाव्य नावांसाठी कोरोनाच्या बंधनामुळे कागदपत्रे जमा करून ठेवण्यात येत आहेत. माझ्या ई-मेल वरून माझ्या पीएने परस्पर विधानसभेतील मथळा उतरवला. त्यानंतर तो कोणीतरी व्हायरल केला. बातमी झाल्यावर मला याची कल्पना आली, स्पष्ट करत आहे,” असं ट्विट करुन पंकजा मुंडे यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.