हिंगणघाट प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हळहळला. यानंतर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून या घटनेबाबतची खंत व्यक्त केली आहे.

काय म्हटलं आहे पंकजा मुंडे यांनी?
“हिंगणघाट येथील थरकाप उडवणाऱ्या घटनेतील तरुणीचा मृत्यू झाला. सुन्न आणि अपराधी वाटतं आहे. इतक्या शतकांमध्ये स्त्री पंतप्रधान, राष्ट्रपती, संरक्षण मंत्री झाल्याचं आपण पाहू शकलो. मात्र एका सामान्य कर्तृत्व करणाऱ्या स्त्रीला सुरक्षा देऊ शकलो नाही. फाशी दिली पाहिजे त्या क्रूर अहंकारी तरुणाला. तिच्या कुटुंबाचे दुःख कल्पनेच्या पीलकडचे आहे. ते कधीही न भरुन येणारे आहे. त्यांच्या आणि समाजाच्या मनावर ओरखडे ओढणाऱ्या गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात देहदंडाची शिक्षा झालीच पाहिजे ”

आज सकाळीच महाराष्ट्र सुन्न झाला तो हिंगणघाटची घटना ऐकून. गेल्या आठवड्यात पीडित तरुणीवर हल्ला करुन तिला पेटवण्यात आलं होतं. यानंतर ही तरुणी गेल्या सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिची ही झुंज अखेर आज अपयशी ठरली. तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा अंत झाला. हा मृत्यू नाही तर हत्या आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे. तर या घटनेतल्या आरोपीला कोणतीही दयामाया दाखवणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. महाराष्ट्राला सुन्न करणारी ही घटना आहे. या घटनेबाबत पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे.

हिंगणघाट या ठिकाणी घडलेल्या घटनेनंतर सगळ्या महाराष्ट्राचाच संताप झाला होता. पीडित मुलगी ४० टक्के भाजली होती. तिची प्रकृती चिंताजनकच होती. आज तिची प्राणज्योत अखेर मालवली. या प्रकरणी आरोपी विकी नगराळेला कठोरातली कठोर शिक्षा द्या अशी मागणी आता केली जाते आहे. ज्या यातना माझ्या मुलीने सहन केल्या त्याच यातना आरोपीने सहन केल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनीही दिली आहे. तर पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून स्त्रीला आपण सुरक्षा देऊ शकलो नाही असं म्हणत घडलेल्या घटनेबाबत खंत व्यक्त केली आहे. तसेच आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही केली आहे.