भाकपचे ज्येष्ठ नेते व विचारवंत कॉ. गोिवदराव पानसरे यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. प्रसंगी मुंबई अथवा पुणे या ठिकाणी हलविण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास शासनातर्फे ‘एअर अ‍ॅम्ब्यूलन्स’ची तयारीही ठेवण्यात आली असल्याची माहिती, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन पानसरे दाम्पत्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,की उमा पानसरे यांची प्रकृती बरी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. गोिवदराव पानसरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यांच्या शरीरातील तीन गोळया बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. पानसरे यांच्या सून मेघा पानसरे यांच्याशी बोलून पालकमंत्री पाटील यांनी त्यांना धीर दिला व पानसरे दाम्पत्यावरील उपचारात शासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास दिला.