अहमदपूर तालुक्यातील हाळणी गावात जि.प. शाळेचे ११ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले. सात-आठ वर्षांपूर्वी प्राप्त केलेल्या या यशामुळे या शाळेचे राज्यात नाव झाले. परंतु पुढे मात्र या शाळेतून एकही विद्यार्थी चमकला नाही.
सन २०१३-१४मध्ये निलंगा तालुक्यात भूतमुगळी येथे जि.प. शाळेतील २९ विद्यार्थी चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या यादीत झळकले. त्यामुळे ही शाळाही चच्रेत आली. ज्या शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेतली होती, त्यांचे मोठे कौतुक झाले. मात्र, या वर्षी या शाळेतील एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकला नाही.
लातूर तालुक्याच्या एकुर्गा गावातील जि.प. शाळेचे गतवर्षी ११ विद्यार्थी चमकले. या वर्षी मात्र याची पुनरावृत्ती झाली नाही.
जिल्हय़ातील ही तीन प्रातिनिधिक बोलकी उदाहरणे. परंतु शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली की त्याचे श्रेय घेण्यासाठी शिक्षक पुढे सरसावतात आणि अपयश येते तेव्हा मात्र वेगवेगळी कारणे सांगितली जातात, हे यातील समान सूत्र. एकाएकी ही गुणवत्ता कशी उदय पावली, याचा शोध घेतला गेला. मात्र त्या त्या वर्षी एखादे आगंतुक पीक उगवावे त्यानुसार ही गुणवत्ता चमकली होती, असे आढळून आले, परंतु आता मात्र एकूणच शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या अशैक्षणिक क्षेत्राच्या घुसखोरीमुळे प्राथमिक शिक्षणापासूनच शैक्षणिक गुणवत्ता हरवत चालली आहे. ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी नेमका पुढाकार घेणार कोण, हा मोठाच प्रश्न सध्या शिक्षण क्षेत्रासमोर आहे.
प्राथमिक शिक्षणापासूनच गुणवत्ता साध्य करण्यासाठी आपल्या मुलास नामवंत शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी खेडोपाडय़ातील मंडळी दक्ष असतात. लातूर, अहमदपूर, उदगीर या शहरांत मुलांना इयत्ता पहिलीपासून शिक्षणासाठी प्रवेश मिळवून पालक आटापिटा करतात. मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळाल्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. शिक्षणासाठी स्वत:ला वाहून घेणारे शिक्षकही मोठय़ा प्रमाणात होते. या पाश्र्वभूमीवर आता मात्र सर्वच बाबतींत बाजार सुरू झाला आहे. परंतु त्यामुळेच या बाजारात प्रत्येक जण सामील होण्यासाठी धडपड करीत आहे.
इयत्ता चौथीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी शिष्यवृत्ती परीक्षेत आपला विद्यार्थी चमकावा, यासाठी शाळा धडपडत असत. पालकही त्यास पूरक भूमिका घेत. हमखास यशाची गुरुकिल्ली काही मंडळींना सापडली व त्यातून मेहनतीच्या ऐवजी कमी मेहनतीत अधिक लाभ घेण्याकडे लोकांचा कल सुरू झाला. सात-आठ वर्षांपूर्वी अहमदपूर तालुक्याच्या हाळणी गावात जि.प. शाळेचे ११ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले. राज्यात या शाळेचे नाव झाले. नेमकी हाळणीत ही गुणवत्ता कशी? याचा शोध घेतला गेला. मात्र, एखादे आगंतुक पीक उगवावे त्यानुसार त्या वर्षी ही गुणवत्ता समोर आली होती. नंतरच्या काळात त्या शाळेतून एकही विद्यार्थी चमकला नाही.
२०१३-१४मध्ये निलंगा तालुक्यातील भूतमुगळी येथील जि.प. शाळेतील २९ विद्यार्थी चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या यादीत झळकले. लातूर तालुक्याच्या एकुर्गा गावातील जि.प. शाळेचे गतवर्षी ११ विद्यार्थी चमकले. मात्र, वेगवेगळय़ा शाळांमधील हे यश अपवाद ठरावे असेच आहे. कारण या यशाची पुनरावृत्ती यातील कुठल्याच शाळेत झाली नाही.
दहा वर्षांपूर्वी लातूरचे तत्कालीन शिक्षणाधिकारी पी. एस. काळे यांनी तालुक्यातील सर्व शाळांना स्वत: भेट देऊन शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले. रात्रीचा दिवस करून गुणवत्तेचा ध्यास घेऊन त्यांनी हे प्रयत्न केले. सर्वशिक्षा अभियानांतर्गत मिशन शिष्यवृत्ती उपक्रम तेव्हा राबवला जात होता. दहा दिवसांचे निवासी शिबिरही घेतले गेले. परंतु नंतर हा उपक्रमच बंद पडला. शिक्षण क्षेत्रात ध्यास घेणारी माणसेच हरवत चालल्यामुळे त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे. पहिलीपासूनच वेगळय़ा व घातक पायंडय़ाची सवय लागली. प्रात्यक्षिक परीक्षेत पकी गुण घेऊन केवळ लेखी परीक्षेत जेमतेम गुण प्राप्त केले, तरी विद्यार्थी उत्तीर्ण होतो. आठवीपर्यंत तर कोणाला नापासच करायचे नाही, हे धोरण असल्यामुळे मागच्या वर्गातून पुढे पाठवण्याची पद्धत रूढ झाली. त्यामुळेही गुणवत्ता हरवत चालली आहे. हरवत चाललेली गुणवत्ता वाढीला कशी लावायची, यासाठी तोंडपाटीलकी करणारे बरेच असले तरी कृतिशील उपक्रम राबवणाऱ्यांची संख्याही नगण्यच आहे.
चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात चमकणारे किती विद्यार्थी नंतर दहावी, बारावी व पदवी परीक्षांत किती जण चमकतात? याचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. चौथीची गुणवत्ता पुढे विकसित करण्यात कोण कमी पडले? की ती गुणवत्ताच कसोटीवर टिकणारी नव्हती? याचेही संशोधन होण्याची गरज शिक्षण क्षेत्रातील जाणकारांमध्ये व्यक्त होत आहे.