रत्नागिरी जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी गेल्या काही महिन्यांपासून निर्धारपूर्वक चालवलेल्या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून कागदी आणि कापडी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्याची योजना हाती घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी पावसाळा संपल्यानंतर डिसेंबर महिन्यापासून जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकावार बैठका घेऊन प्लास्टिक निर्मूलन आणि स्वच्छतेसाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणा आणि सर्वसामान्य जनतेचा सहभाग करून घेण्यात येत आहे. मात्र अशा प्रकारे प्लास्टिकला विरोध करताना पर्याय देण्याचीही गरज लक्षात आल्यामुळे जाधव यांनी त्या दृष्टीने योजना तयार केली आहे. त्यानुसार शिलाई यंत्रावर शिवलेल्या कागदी आणि कापडी पिशव्या बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या ५७ गटांसह नगरपालिका, बचत गट आणि शंभर शिलाई मशिन वाटप करण्यात येणार आहेत. या यंत्रांवर शिवलेल्या कागदी आणि कापडी पिशव्या स्थानिक बाजारपेठांमध्ये वाजवी दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे व्यापारी किंवा नागरिकांची गैरसोय न होता प्लास्टिकमुक्तीला पर्याय निर्माण होऊ शकेल. दरम्यान जिल्ह्य़ातील अन्य तालुक्यांप्रमाणे रत्नागिरी शहरातही पुढील आठवडय़ापासून स्वच्छता मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी शहरातील ७ प्रभागांचा आराखडा तयार करण्यात आला असून प्रत्येक प्रभागात दोन दिवस ही मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातही याच पद्धतीने कार्यवाही केली जाणार आहे. या संपूर्ण मोहिमेत जिल्हाधिकारी जाधव सुरुवातीपासून स्वत: सहभागी होत आले आहेत. आगामी काळातही आपण त्यासाठी वेळ देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले.