शिवसेनेची पदे देण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचे सांगत संपर्कप्रमुख नितीन बानगुडे-पाटील यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढीत दहन करण्याचा प्रकार बुधवारी मिरजेत घडला. सेनेच्या दुस-या गटातील कार्यकर्त्यांनी नेत्याची बदनामी केल्याप्रकरणी सेनेचे तालुका प्रमुख रवींद्र नाईक यांच्यासह तिघांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
जिल्ह्यात शिवसेनेत गटबाजी उफाळून आली असून तालुका प्रमुख रवींद्र नाईक यांनी बुधवारी संपर्कप्रमुख नितीन बानुगडे यांच्यावर गंभीर आरोप केले. सेनेत पदांचे वाटप करण्यासाठी पसे मागितले जात असल्याचा आरोप करून या गटबाजीला संपर्क प्रमुखच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रा. बानुगडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची आज मिरज शहरात धिंड काढण्यात आली. तसेच पुतळ्याची गाढवावरून धिंड काढून मार्केट परिसरात दहन करण्यात आले.
दरम्यान, सेनेच्या एका गटाने या कृत्याला जबाबदार धरून सेनेचे जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्या घरासमोर निदर्शने केली. तसेच पक्ष नेत्याची बदनामी केली म्हणून शहर पोलीस ठाण्यात तालुका प्रमुख नाईक यांच्यासह तिघांविरुध्द तक्रार दिली आहे. या प्रकारामुळे सेनेतील दुफळी समोर आली आहे.