मद्य व्यवसायाला सोडचिठ्ठी ; लघुउद्योगांच्या प्रशिक्षणातून सक्षमीकरणाचा मार्ग

महिला सक्षमीकरणाचा मुद्दा प्रामुख्याने शहरी भागात ऐरणीवर आला. ग्रामीण भागात बचत गटांच्या माध्यमातून सक्षमीकरणाची वाटचाल आरंभली. पण, शहरी- ग्रामीण परिसर कवेत घेणाऱ्या योजनांमधून अत्यंत दुर्लक्षित व गुन्हेगारीचा शिक्का बसलेला पारधी समाज दुर्लक्षितच राहिला. पारंपरिक दारू गाळण्याचा व्यवसाय हेच समाजाचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन ठरलेल्या या समाजावर दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्य़ात हा व्यवसाय नेहमी आसूड ओढायचा. पोलिसांचा छापा पडला की धूम ठोकणाऱ्या बायाबापडय़ांवर आता पोलिसांनीच मदतीचा पदर पांघरला आहे. पुरुषांपेक्षाही दयनीय स्थिती असणाऱ्या या समाजातील महिलांना जणू नवसंजीवनीच मिळाली. ग्रामीण औद्योगिकीकरणाच्या मार्गाने निघालेल्या या महिला सक्षम तर झाल्याच, पण दारू गुत्त्यापासून कुटुंबाला दूर ठेवण्यातही त्या यशस्वी ठरल्या.

What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
is it wrong to expect rich husband
‘श्रीमंत नवरा पाहिजे’, अशी अपेक्षा महिलांनी जोडीदाराकडून ठेवणे चुकीचे आहे का?
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर
woman works ten time then men
‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! पुरुषांपेक्षा ‘इतके पट’ अधिक काम करतात महिला

जिल्ह्य़ात पारधी समाजाचे २२ बेडे आहेत. दारूबंदी असलेल्या या जिल्ह्यात या समाजाकडून मोठय़ा प्रमाणात दारूनिर्मिती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नवसंजीवनी योजनेला हात घातला. या योजनेत पाच लाख रुपयांची तरतूद झाली. पण नेमके करायचे काय, हा प्रश्न महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण (एमगिरी) संस्थेने सोडविला. विविध उत्पादनांचे प्रशिक्षण सुरू झाले. उदबत्ती निर्मिती, फ्लोअर क्लिनर, सूतकताई अशा सोप्या उद्योगांचे प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. प्रफु ल्लकुमार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. वायफ ड बेडय़ातील काही महिलांची वर्षभरापूर्वी निवड झाली. आता या महिला स्वावलंबी व स्वाभिमानाचे जीवन जगू लागल्या आहेत. एका महिलेला मासिक चार ते पाच हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. सुरुवातीला उत्पादन विक्रीची मुख्य समस्या होती. मग पोलिसांच्या कुटुंबीयांनीच त्याची खरेदी केली. उत्पादनाचे प्रमाण वाढल्यावर सावंगीचे वैद्यकीय महाविद्यालय, हिंदी विद्यापीठ अशा संस्थांशी करार केले.

वायफ डनंतर पांढरकवडा, आंजी अंदोरी, बोरगाव, सास्ती या गावात लघुउद्योगांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी वायफ ड बेडय़ाला भेट देऊन कौतुकाची पावती दिली. सध्या ४५ महिला या उद्योगात आहेत. काही ठिकाणी पोलीस वसाहतीत नाममात्र दराने या महिलांना दुकाने देण्यात आली. स्वत: उत्पादित केलेल्या वस्तूंखेरीज अन्य वस्तूही विक्रीस आहेत. देवळी बेडय़ातील बारा कुटुंबांना शेळीपालन व्यवसायासाठी शेळ्या देण्यात आल्या. सूतकताई करणाऱ्या महिलांना इतरांच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळत असल्याचे दिसून आल्यावर त्यांना रोपवाटिकेचा जोडधंदा देण्यात आला. या महिलांना त्यांची मुलेही साथ देतात. कधीकाळी बेडय़ातून अवैध धंद्यापोटी काही पैसे पोलिसांच्या खिशात जायचे, आता या पोलीस बेडय़ावरील वस्तू खरेदी करतात. हा बदल पाचही बेडय़ांना आनंददायी वाटतो.

मध्यंतरी या गृहोद्योगी महिलांचा मेळावा जिल्हाधिकारी शैलेश नवल यांच्या उपस्थितीत पार पाडला. तेव्हा रस्ते, शाळा, शौचालये व अन्य मागण्यांची यादीच महिलांनी सादर केली. मेळाव्यात प्रशासनाने शौचालयाची मागणी तात्काळ मान्य केली. प्रत्येकाला चांगले जीवन जगण्याची आस असते. कुणी तरी योग्य मार्गदर्शन केले तर त्यांचा जीवनमार्ग सुकर होतो, हे पारधी महिलांच्या बदललेल्या परिस्थितीवरून दिसून आले आहे.

१) फ्लोअर क्लीनर तयार करताना महिला व युवक.

२) सूतकताईचे प्रशिक्षण

आमूलाग्र बदल करण्याचा दावा आम्ही करीत नाही. ही सुरुवात आहे. दारू गाळण्याचा व्यवसाय आम्ही बंद करीत होतो. पण, पर्याय नसल्याने पारधी मंडळी परत त्याच धंद्याकडे वळत होती. आता पर्याय दिल्याने त्यांना उत्पन्नाचे साधन मिळाले. बदलण्याची मानसिकता महिलांत प्रामुख्याने आहे. एका महिलेने तिच्या कुटुंबातील दहा व्यक्तींना चांगल्या कामात लावल्याचे दिसून आले. विस्थापितांना सुस्थापित करण्याचा व कायदेशीर जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहे. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कालांतराने चांगलेच बदल दिसतील.

अंकित गोयल, पोलीस अधीक्षक.

गावाबाहेरच पालवात राहणाऱ्या आमच्या कुटुंबाला आता गावकऱ्यांसोबत राहायला मिळत आहे. आयुष्य भटकत चालले होते. आधार मिळाल्याने या गावीच ठिय्या आहे. हात मजुरीची कामे मिळू लागली. पोलिसांनी शेळ्या दिल्या. बरे वाटले. आमच्या आवडीचे काम आहे. पोरही मदत करतात. आता सरकारने रस्ता करून द्यावा.

– आशा काळे

तरुण पिढीला चांगले जीवन जगावेसे वाटते. जुन्या पिढीतील लोकांना जुने व्यवसाय सोडावे असे वाटत नाही. दारू गाळण्याचे काम आम्ही मात्र नवा रोजगार आल्यावर बंद केले. पोरही हातभार लावतात. त्यांनाही आता नवा व्यवसाय आवडू  लागला आहे

– नीताबाई भोसले