News Flash

शरद पवार काय निर्णय घेणार?; राष्ट्रवादीच्या मोजक्या नेत्यांची दिल्लीत बैठक

शिवसेना नेते संजय राऊतही घेणार भेट

शरद पवार काय निर्णय घेणार?; राष्ट्रवादीच्या मोजक्या नेत्यांची दिल्लीत बैठक
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. (संग्रहित छायाचित्र)

राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाने राजकीय वर्तुळ ढवळून निघालं आहे. दरमहा १०० कोटी रुपये जमवून द्या, असं देशमुख यांनी सचिन वाझे यांना सांगितलं होतं, असा आरोप सिंग यांनी केला आहे. या लेटरबॉम्बनंतर भाजपा देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाला असून, आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित असणार आहे. तर शिवसेना नेते संजय राऊतही पवारांची भेट घेणार आहेत.

“दरमहा १०० कोटी रुपये जमवून द्या. मुंबईतली १७५० मद्यालये, पब, हुक्का पार्लर यांच्याकडून महिन्याला दोन ते तीन लाखांचा हप्ता घेतल्यास ४० ते ५० कोटी रुपये जमा होऊ शकतात. उर्वरित रक्कम अन्य मार्गाने जमा करता येईल, अशा सूचना गृहमंत्री देशमुख यांनी तत्कालिन साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि सहायक आयुक्त संजय पाटील यांना दिल्या होत्या,” असा गौप्यस्फोट परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला. या पत्रानंतर राज्यात राजकीय भूंकप आला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पत्रानंतर भाजपाकडून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून, राज्यात अचानक निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ही बैठक होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊतही दिल्लीत जाणार असून, शरद पवार यांची भेट घेणार आहे. या बैठकीत अनिल देशमुख यांच्याबाबत चर्चा केली जाणार असून, शरद पवार नेमका काय निर्णय घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

पत्रात काय?

’काही महिन्यांपासून देशमुख मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षाचे (सीआययु) प्रमुख सचिन वाझे यांना सतत आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावून घेत होते.

’देशमुख यांनी वाझे यांना हप्ते गोळा करण्याच्या सूचना केल्या होत्या. फे ब्रुवारीत ज्ञानेश्वारी या निवासस्थानी वाझेंशी झालेल्या भेटीत देशमुख यांनी महिन्याला १०० कोटी रुपयांचे हप्ते गोळा करण्याचे ‘लक्ष्य’ वाझे यांना दिले होते.

’मुंबईत १७५० बार, हुक्का पार्लर, पब्ज असून त्यांच्याकडून प्रत्येकी दोन ते तीन लाखांचे हप्ते वसूल केल्यास ४० ते ५० कोटी रुपये जमा होऊ शकतात. उर्वरित रक्कम अन्य मार्गाने जमवता येईल, असे देशमुख यांनी वाझेंना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2021 10:40 am

Web Title: parambir singh letter sharad pawar call ncp leaders meeting in delhi bmh 90
Next Stories
1 या सगळ्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं, पण…; राऊतांनी दिला आत्मपरीक्षणाचा सल्ला
2 “बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?”, अमृता फडणवीसांचा सरकारवर निशाणा
3 हमको तो बस तलाश नए रास्तो की है,…; ‘लेटरबॉम्ब’नंतर संजय राऊतांचं ट्विट
Just Now!
X