गेली अनेक वर्षे तीन-चार पिढय़ा रोजच दारूची निर्मिती करायची अन् विकायची. पोलिसांचे अधूनमधून धाडसत्र. परंतु लोहय़ाच्या पोलीस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी मनावर घेतले. तांडय़ावर जागृती केली, महिला-पुरुषांना ते पटले आणि पांगरा तांडा दारूमुक्त करण्याचा एकमुखी निर्णय अमलात आला. दारू विकणाऱ्यांना ५ हजारांचा दंड करण्याचा महिलांचा निर्धार पांगरा तांडय़ावर आशेचे नवे किरण पाडणारा ठरला..
कंधार तालुक्यातील पांगरा तांडा हे गाव लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतले टोकाचे गाव. तांडय़ावर बाराही महिने हातभट्टी काढली जात होती. गावात जाताच ‘डमरू’चा घमघम वर्दी देई. पोलिसांना मात्र कुठेच दारूची केस मिळाली नाही, तरीही तांडय़ावर मिळायचीच. शिक्षणासह इतर सुविधा, सामाजिक बदल जेमतेम. जीवनाचा आविभाज्य घटक हातभट्टीनिर्मितीची शेती! पाचशे जणांची वस्ती, पण दारूनिर्मितीत व्यस्त!
लोहय़ास दीड महिन्यापूर्वी अनिलसिंह गौतम रुजू झाले आणि अवैध धंद्यावर वचक बसवला. पांगरा तांडय़ावर छापा टाकला. तेथील दृश्य पाहून गौतम यांनी येथे सामाजिक सुधारणा करण्यासाठी पथदर्शक प्रयोग राबविला. नामदेव पवार, रमेश पवार, रामजी पवार, चंपती जाधव, पंडित जाधव यांच्यासह आठ जणांवर दारूचा गुन्हा नोंदवला. तांडय़ावरील लोकांना एकत्रित करून मार्गदर्शन केले. महिलांना या धंद्याची घृणा निर्माण झाली. तेथेच सर्व तांडावासीयांनी दारूबंदीचा निर्धार केला. दारूनिर्मिती करणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड करण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. वर्षांनुवर्षे चालणारा हा व्यवसाय स्थानिकांनीच बंद करण्याचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी केली. किशन राठोड, पोलीस पाटील दत्ता पाटील, बाबुराव राठोड, सरपंच विठ्ठल पाटील, शिवाजी कोठेवाड आदींच्या साक्षीने तांडय़ावर दारूबंदीचा निर्धार झाला.
कौटुंबिक ‘तंटामुक्ती’ रांग
गौतम यांच्या पुढाकाराने कौटुंबिक तंटे मिटविले जात आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतीलच केवळ नव्हे, तर अहमदपूर, परभणीच्या सीमेलगतच्या भागातून महिला गाऱ्हाणी घेऊन ठाण्यात येत आहेत. या वेळी सामोपचाराने कौटुंबिक तंटामुक्ती केली जाते. तडजोड न झाल्यास लागलीच गुन्हा नोंदविला जातो. दररोज १०-१२ कु टुंबे ठाण्यात येत आहेत.