अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या धनगर समाजाच्या मागणीला विरोध करण्यासाठी आदिवासींनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. पारंपरिक वेशभूषेत काढलेल्या मोर्चात परभणी व िहगोली जिल्ह्यांतील आदिवासी समाज मोठय़ा प्रमाणात सहभागी झाला होता.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. आदिवासींचे हक्क घटनाबाह्य पद्धतीने हिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांस सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा मोर्चातून देण्यात आला. आदिवासी विकासासाठी लोकसंख्येच्या आधारावर निधी उपलब्ध करून प्रशासकीय स्तरावर अंमलबजावणी व्हावी, आदिवासींच्या विकासाचा अनुशेष मोठा असून त्यामुळे आदिवासीबहुल क्षेत्रात नक्षलवादी चळवळी कार्यरत झाल्या आहेत. या बाबत सरकारने विकासयोजनांची अंमलबजावणी काटेकोर करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
मोर्चात परभणी व िहगोली जिल्ह्यांतील आदिवासी महिला-पुरुष मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक व्यवसायाचा देखावा व वेशभूषेत अनेकांनी यात सहभाग घेतला. आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. विठ्ठल बोथीकर, कार्याध्यक्ष प्रभाकर भंडगे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. राजेश धनजकर, सचिव संभाजी वागतकर, आदिवासी आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष प्रकाश गारोळे, विलास मारकळ, परमेश्वर खोकले आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. मोर्चादरम्यान आदिवासींच्या मागण्या लावून धरणारे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. ससा, घोरपड, खेकडा अशा प्राण्यांना हातात घेऊन मोर्चात सहभागी झालेले आदिवासी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.