परभणी, बीड व लातूर जिल्ह्य़ांमध्ये अवकाळीचा कहर सुरूच आहे. सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे काढणी सुरू असलेल्या गहू व ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले. मोसंबी व आंब्यालाही फटका बसला. पाथरी व सोनपेठ तालुक्यांतील काही गावांमध्ये पावसासह गारपीट झाली. मंगळवारी सकाळी आठपर्यंत १६.६ मिमी पावसाची नोंद झाली.
सध्या ज्वारी, गव्हाची काढणी सुरूआहे. अनेक ठिकाणी उशिरा पेरणी झालेला गहू व ज्वारी शेतातच उभी आहे. गेल्या ४ दिवसांपासून परभणी जिल्ह्यात कडक ऊन पडत आहे. उन्हाळा सुरू झाला असतानाच सोमवारी अचानक दुपारनंतर वातावरणात बदल झाला. सायंकाळी जोरात वारे वाहू लागले. विजांचा कडकडाटही ऐकू येत होता. आकाशात काळे ढग जमा होऊन काही क्षणात पावसालाही सुरुवात झाली. सात ते साडेआठ दरम्यान परभणी शहरासह पाथरी, मानवत, जिंतूर, सेलू, पूर्णा, सोनपेठ या भागात पाऊस बरसला. सुमारे अर्धा तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी झाले. नंतरही पावसाची रिमझिम सुरू होती. रात्री नऊच्या दरम्यान सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव, गंगािपप्री, लोहिग्राम, शिरोळी, पाथरी तालुक्यातील तारुगव्हाण, डाकुिपप्री या परिसरात १०-१५ मिनिटे गारांचा पाऊस झाला. पाथरी तालुक्यात रात्रभर पावसाची रिपरिप सुरूहोती. जिंतूर तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. बोरी, कौसडी या भागात पावसाचा जोर चांगलाच होता. पूर्णा तालुक्यातील ताडकळस, परभणी तालुक्यातील िपगळी, पेडगाव, झरी परिसरातही  पावसाची हजेरी होती. या पावसाने आंबा, मोसंबीचे मोठे नुकसान केले. मोसंबीच्या बागांमध्ये वाऱ्यामुळे फळांचा सडा पडला होता. सध्या अनेक ठिकाणी ज्वारीची काढणी सुरू आहे. कापणी केलेल्या ज्वारीच्या पेंढय़ा बांधून शेतात टाकल्या आहेत. ज्वारीसोबतच कडबा काळा पडण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी उभी ज्वारी व गहू आडवा झाला.
बीडमध्येही धुडगूस
बीड – आठवडय़ाभरानंतर सोमवारी सायंकाळपासून जिल्ह्य़ात अवकाळी पावसाने पुन्हा आगमन केले. काही ठिकाणी गारांचाही वर्षांव झाला. दुसऱ्या दिवशीही सायंकाळी सर्वदूर पावसाने हजेरी लावून रब्बीची उरलीसुरली पिकेही नासाडून टाकली. आंब्यासह द्राक्षे, गहू, ज्वारी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले. राज्य सरकारकडून या नुकसानीची भरपाई मिळेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप पेरणीच्या वेळी पावसाने दडी मारल्याने दुष्काळ नशिबी आला. खरिपाची पिके गेल्यानंतर सरकारने पंचनामे करून जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही. मध्यंतरी थोडय़ाशा पावसावर, जमिनीतील पाण्यावर शेतकऱ्यांनी रब्बीची पिके घेतली. थेंब थेंब पाणी घालून वाढवलेली पिके हातात आली असतानाच मागील आठवडय़ात अवकाळी पावसाने झोडपून काढले. सोमवारी मोठय़ा प्रमाणात सुटलेला सोसाटय़ाचा वारा, गारांचा मारा यामुळे शेतात उभी असलेली आणि काढून ठेवलेल्या ज्वारी, गहू, मका या पिकांसह आंबा, द्राक्षबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी सायंकाळीही पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांची दाणादाण उडवली.
लातूरकर शेतकरी सर्द
लातूर – जिल्हाभर सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर मंडळात ५ मिमी, तर चाकूर तालुक्यातील चाकूर मंडळात ९ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी उदगीर, निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी व औसा या तालुक्यांत पाऊस झाला. सोमवारी अहमदपूर, चाकूर, लातूर, रेणापूर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. पावसाचे प्रमाण कमी असले, तरी रब्बी पिकांना याचा चांगलाच फटका बसला. गतवर्षी याच तारखांना जिल्हाभरात गारपीट झाली होती. या पावसाचा परिणाम येत्या पावसाळ्यावर होण्याची भीती शेतकरीवर्गात व्यक्त होत आहे.