तरुण आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचं करोनामुळे निधन झालं. त्यांच्यावर पुण्यातल्या रुबी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्रिपुरा येथील वित्त विभागाचे सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व कोषागार संचालक पदाचा अतिरिक्त पदभार अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या. मूळचे  मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यातील असलेले सुधाकर शिंदे यांचे आज करोनामुळे पुण्याच्या रुबी रुग्णालयात निधन झाले. अवघ्या पस्तीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दोन आठवड्यांपूर्वी शिंदे पत्नी व मुलीसह चौदा दिवसांची सुट्टी घेऊन आपल्या गावी आले होते. त्रिपुरा केडरच्या २०१५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सुधाकर शिंदे हे मूळचे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्याच्या उमरा येथील रहिवाशी आहेत. आपल्या गावी येण्यासाठी शिंदे यांनी १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२० अशी चौदा दिवसांची रजा घेतली होती. रजा मंजूर झाल्यानंतर ते पत्नी आणि तीन वर्षाच्या मुलीसह गावी आले होते.

दरम्यान, गावातच त्यांना करोनाची बाधा झाली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर सर्वप्रथम नांदेडच्या गुरूगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती सुधारत असताना त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्यांना औरंगाबादहून पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र आज उपचारा दरम्यान शिंदे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, वडील, चार भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

सुधाकर शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण परभणीच्या नवोदय विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झाले. त्यानंतर पुणे आणि दिल्ली येथे त्यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून यश मिळवले. तरुण वयात शिंदे यांचे निधन झाल्याने त्यांच्या सहकारी आणि प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी शोक व्यक्त केला असून, शिंदे यांच्या सारख्या तरुण आयएएस अधिकार्‍यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.