नवीन महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या संगीता वडकर, तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे भगवान वाघमारे यांचाच अर्ज दाखल झाल्याने या दोघांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी (दि. ५) या बाबत अधिकृत घोषणा होईल. दोन्ही पदांसाठी या दोघांचे प्रत्येकी एक अर्ज आल्याने महापौर-उपमहापौर निवडीची औपचारिकताच शिल्लक राहिली आहे. महापालिकेवर आपला प्रभाव ठेवण्यात महापौर प्रताप देशमुख यशस्वी झाले आहेत.
महापौर-उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शनिवार शेवटचा दिवस होता. महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या वडकर यांचा, तर उपमहापौरपदासाठी काँगेसच्या वाघमारे यांचा अर्ज आला. वडकर यांच्या पत्रावर सूचक म्हणून अश्विनी वाकोडकर, तर सचिन देशमुख अनुमोदक, तसेच वाघमारे यांच्या अर्जावर सूचक डॉ. विवेक नावंदर, तर गणेश देशमुख अनुमोदक आहेत.
मनपाच्या २०१२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत मिळाले. राष्ट्रवादीने भाजपचे दोन व एका अपक्ष सदस्याला सोबत घेत सत्ता मिळवली. राष्ट्रवादीचे प्रताप देशमुख महापौर, तर सज्जूलाला उपमहापौर झाले. त्या वेळीही काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडीचा प्रस्ताव दिला होता. परंतु राष्ट्रवादीकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेसला अडीच वष्रे सत्तेच्या बाहेर राहावे लागले. विधानसभेपूर्वीच माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्याविरोधात जिल्हा परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे एकत्र आले. याच पॅटर्नप्रमाणे महापालिकेत पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र आले.
महापौर-उपमहापौर निवडीच्या निमित्ताने काँगेस-राष्ट्रवादी एकत्र आले असले, तरी नव्यानेच काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सुरेश वरपूडकर यांनाही शह देण्याचा प्रयत्न या निवडीत झाला. मावळते महापौर देशमुख यांनी आपला प्रभाव महापालिकेवर कायम ठेवला. या संपूर्ण निवडीत त्यांची भूमिका निर्णायक राहिली.