पोलीस उपमहानिरीक्षकांची व्यापाऱ्यांशी चर्चा

नांदेड : परभणीचे खासदार संजय जाधव यांना धमकी देऊन खंडणी मागण्याच्या प्रकारानंतर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांनी  ज्या व्यापाऱ्यांना रिंधा टोळीतील गुंडांनी धमकावले होते त्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली असून लवकरच या टोळीचा बीमोड केला जाईल असा दावा केला आहे. दरम्यान, खासदार जाधव यांना धमकावून खंडणी मागणाऱ्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेऊन परभणी पोलिसांच्या हवाली केले आहे.

खासदारांना धमकी दिल्याच्या प्रकारानंतर पोलीस दलात वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या असून मागील काळात ज्या व्यापारी, व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी देण्यात आली अशा सर्वांशी संवाद साधला जात आहे. ‘पच्चास लाख रूपीये दो, भाईने भेजा है, नही तो भाईसे बात करो’ असा फिल्मीस्टाईल डायलॉग मारून  नांदेडमधील मोठे व्यापारी, कंत्राटदार आणि व्यावसायिक यांना फोनवर खंडणी मागणे आणि खंडणी न दिल्यास गोळीबार करणे अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. अशा प्रकारामुळे हरविंदरसिंघ ऊर्फ रिंधा याची दहशत पसरली आहे. पोलिसांनी गोळीबाराच्या प्रत्येक घटनेतील आरोपींना जेरबंद केले आहे; परंतु काही भुरटे रिंधाच्या नावाने फोन करून खंडणी मागत असल्याचा प्रकार होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हार्डवेअरचे व्यापारी आशिष पाटणी, हॉटेल व्यावसायिक सुरेश राठोड, गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले गोविंद कोकुलवार, प्रसिद्ध डॉक्टर मनिष कत्रुवार, ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक इंदरपालसिंघ भाटिया यांना रिंधाच्या हस्तकांनी धमकी देऊन खंडणी मागितली होती. यापैकी काहींना रिंधाने स्वत: व्हिडीओ कॉल करून खंडणी मागितली होती.त्यामुळे निसार तांबोळी यांनी या प्रकरणात लक्ष घातले असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस आणि नागरिकांमध्ये विश्वास संपादन व्हावा, या उद्देशाने व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. विश्वास निर्माण करावा लागेल. माहिती मिळाली तरच पुढे जाता येईल, अन्यथा तपासाची गती मंदावली जाऊ शकते. विसंवाद असल्यास अडचणीतूनही मार्ग निघू शकतो, व्यापा?ऱ्यांनी घाबरु नये.

— निसार तांबोळी, पोलिस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र