परभणी मतदारसंघातील प्रचार मंगळवारी थंडावला. शेवटच्या दिवशी उमेदवारांनी ठिकठिकाणी पदयात्रा, रोड शो करून निवडणुकीचे वातावरण कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. एकूण १७ उमेदवार िरगणात असले, महायुतीचे संजय जाधव व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे विजय भांबळे यांच्यात चुरशीची लढत आहे.
राष्ट्रवादी व शिवसेना उमेदवारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केले, तर भांबळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभा घेऊन उत्तर दिले. दोघांनीही शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल केला होता. जाधव यांच्यासाठी सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, आमदार दिवाकर रावते, उपनेते लक्ष्मण वडले, विजय कदम यांच्या सभा झाल्या. जिंतुरात काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी सेनेसाठी प्रायोजित केलेली सभा भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी घेतली. अभिनेते आदेश बांदेकर यांचा परभणीत रोड शो झाला. स्थानिक पातळीवर सर्वच पक्षांतील नेत्यांनी स्वतंत्रपणे खेडय़ा-पाडय़ात सभा, कॉर्नर बठका घेतल्या.
भांबळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या परभणी व घनसावंगीत सभा झाल्या. परभणीत स्वतंत्र संयुक्त बठक त्यांनी घेतली. अजित पवार यांची परभणी, जिंतूर, आर. आर. पाटील यांची मानवत, पालम, परतूर, पाथरी, तर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांची गंगाखेड, जिंतूर व खासदार माजीद मेमन यांची सभा झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बोर्डीकरांचा गड सेलूमध्ये भांबळे यांच्यासाठी स्वतंत्र सभा घेतली. भांबळे यांच्यासाठी अभिनेत्री वर्षां उसगावकर यांचा परतूर, घनसावंगी, पूर्णा व मानवत येथे रोड शो, अभिनेत्री भाग्यश्री यांचा पाथरी, सेलू, जिंतूर येथे रोड शो, तर ऊर्मिला मातोडकर यांचा मंगळवारी परभणीत रोड शो करून भांबळे यांच्या प्रचाराचा शेवट केला.
भाकप उमेदवार राजन क्षीरसागर यांनी खेडय़ा-पाडय़ांत छोटय़ा-छोटय़ा सभा घेतल्या. त्यांच्यासाठी शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, भालचंद्र कांगो, कॉ. गोिवद पानसरे यांच्या विविध ठिकाणी सभा झाल्या. समाजवादी पक्षाचे अजय करंडे यांच्यासाठी आमदार अबू आझमी यांनी परभणीचा धावता दौरा करून परभणीला छोटेखानी सभा घेतली. आप च्या सलमा कुलकर्णी यांच्या प्रचारासाठी राज्य वा देशपातळीवरील एकही नेता आला नाही. हीच स्थिती बसपचे उमेदवार गुलमीर खान यांच्याबाबत राहिली.
परभणीत मतदानासाठी ६ हजार कर्मचारी तनात
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी (दि. १७) होणाऱ्या मतदानाची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली असून, मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. एक हजार ९७४ केंद्रांवर मतदान होणार आहे. या कामी ६ हजार २८३ कर्मचारी तनात केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी एस. पी. सिंह यांनी दिली.
सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे असून, जात, धर्म वा आर्थिक प्रलोभन व आमिषांना बळी न पडता मतदान करावे. मतदानाच्या दिवशी मतदारांनी निर्भयपणे, कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन सिंह यांनी केले. परभणी मतदारसंघात १७ उमेदवार िरगणात आहेत. जिल्हय़ात राबविलेला मतदार नोंदणी कार्यक्रम, तसेच मतदान केंद्रस्तरीय विशेष नोंदणी शिबिरामुळे मतदारसंघात मतदारांची संख्या १८ लाख दोन हजार ८९४ आहे. १ हजार ९७४ केंद्रांवर मतदान होईल.
जिल्हय़ातील परभणी, गंगाखेड, जिंतूर व पाथरी, तसेच जालना जिल्हय़ातील परतूर व घनसावंगी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. परभणीत १ हजार ३४०, तर परतूर व घनसावंगी मतदारसंघात मिळून ६३४ मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रावर अपंग व्यक्तींसाठी रॅम्पची सुविधा उपलब्ध केली असून अंध मतदारासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर ब्रेल लिपीची सुविधा आहे. निवडणुकीसाठी परभणी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून, जिल्ह्यातील मनुष्यबळाबरोबरच अन्य जिल्ह्यांतूनही पोलीस कुमक मागविण्यात आली आहे.
परभणी मतदारसंघात सहाजणांची तडीपारी
लोकसभा निवडणुकीत गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या ५४ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव होते. पकी ६ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ही माहिती दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार बठकीत पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, महेश वडदकर उपस्थित होते. जिल्ह्यातील ५४ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पोलीस प्रशासनाने पाठविले होते. पकी सहाजणांच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला. अर्जुन सुभाष सामाले, सुमित श्रीराम घागरमाळे, अमरदीप रामचंद्र रोडे, प्रशांत पांडुरंग कागदे, दशरथ निलाजी जाधव, शेख हबीब खा ऊर्फ गुड्ड या सहाजणांना तडीपार करण्यात आले. उर्वरित प्रस्तावावर उद्यापर्यंत (बुधवार) निर्णय घेतला जाणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.
एकूण ६९ संवेदनशील केंद्रे आहेत. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. जिल्ह्यातील १०५ अधिकारी, १ हजार ३४२ कर्मचारी, बिनतारी संदेश विभागाचे ४ अधिकारी व २५ कर्मचारी, धडक कृतिदलाचे पथक, राखीव दलाच्या दोन तुकडय़ा, बॉम्बशोधक पथक यासह बाहेरील जिल्ह्यातील तीन परिवीक्षाधीन उपअधीक्षक, ४५ अधिकारी, ४५० कर्मचारी, २०० प्रभारी, राज्य राखीव दलाच्या तीन व केंद्रीय दलाच्या दोन तुकडय़ा, ७०० गृहरक्षक असा बंदोबस्त आहे.