29 March 2020

News Flash

तीन आठवडय़ांनी पाणी, तेही मध्यरात्री !

निवडणुकीत पाण्याचा मुद्दा प्रभावी ठरू शकतो, अशी चिन्हे आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

परभणीकर वैतागले; निवडणुकीत पाण्याचा मुद्दा केंद्रस्थानी

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस शहरवासीयांना वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळेल, असे आश्वासन देणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यातही परभणीकरांचा पाण्यासाठी अंत पाहिला असून आता नागरिकांना तीन आठवडय़ांनी पाणी मिळू लागले आहे. शहरातील पाणीपुरवठय़ाची यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली असून पाणी केव्हा येईल याबाबतही मोठी अनिश्चितता आहे. पाण्याची वेळ अनेकदा काही भागात मध्यरात्री ठेवण्याचा प्रताप महापालिकेने केला आहे. निवडणुकीत पाण्याचा मुद्दा प्रभावी ठरू शकतो, अशी चिन्हे आहेत.

शहरवासीयांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आली. सुरुवातीला १०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेली ही योजना २०० कोटींच्याही पुढे सरकली. येलदरी धरणावरून परभणीला पाणी देण्याबाबतची ही योजना अद्यापही पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही. शहरात सध्या पिण्याच्या पाण्याचे मोठे दुíभक्ष्य असून बहुतेक नागरिकांनी पिण्यासाठी जारचा पाणीपुरवठा एखाद्या रतिबाप्रमाणे लावला आहे. बहुतांश परभणीकर सध्या विकतचे पाणी पितात. महापालिकेला मात्र अद्यापही शहरवासीयांना पुरेसे पाणी देता आले नाही. उन्हाळ्यात महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. पावसाळा सुरू झाल्यानंतर हे सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. पावसाळा सुरू झाला तरी महापालिकेला शहरवासीयांसाठी नियमित पाणी देणे शक्य झाले नाही. सुरुवातीला १२ ते १५ दिवसाला होणारा पाणीपुरवठा आता तीन आठवडय़ांवर आला आहे.

अधूनमधून होणाऱ्या दुरुस्त्यांसारख्या तकलादू उपायांवर महापालिका काही प्रमाणात खर्च करत असली तरीही जेव्हा यंत्रणेत बिघाड होतो तेव्हा पर्यायी पाणीपुरवठय़ाचे नियोजन महापालिकेला करता येत नाही. राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभाचे छत कोसळल्यानंतर शिवाजीनगर, संभाजीनगर या भागात तब्बल महिनाभर पाणीपुरवठा झाला नाही. विकतचे टँकर घेऊन लोकांनी आपली तहान भागवली. अजूनही शहरातल्या बऱ्याच भागांमध्ये पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडले आहे तर काही भागात जेव्हा पाणी येते तेव्हा ते यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे सहा ते आठ  तास राहते.

दावा फोल

शहराला पाणीपुरवठा करणारी वाढीव पाणीपुरवठय़ाची योजना आता अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती आयुक्त रमेश पवार यांनी तीन महिन्यांपूर्वी दिली होती. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळेल असा दावाही त्यांनी केला होता. आयुक्तांचा हा दावा फोल ठरला असून भर पावसाळ्यात परभणीकरांना पाण्याविना हाल सहन करावे लागले आहेत. तीन आठवडय़ातून एकवेळ होणारा पाणीपुरवठा कोणत्या वेळी होईल याचा काही नेम नाही. मध्यरात्री अनेकदा काही भागात पाणीपुरवठा होतो, बहुतेक लोक झोपेत असतात आणि रात्री पाणी येऊन गेले हे त्यांना सकाळी कळते. मध्यरात्री पाणीपुरवठा करणारी कदाचित ही एकमेव महापालिका असावी. सध्या शहराला पाणीपुरवठा करणारी जी यंत्रणा आहे, त्याला पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यावरून महावितरण विरुद्ध महानगरपालिका यांच्यात समन्वय नसल्याचेही दिसून येत असल्याचे सांगण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2019 1:16 am

Web Title: parbhani water after three weeks abn 97
Next Stories
1 निवडणुकीनंतर शेकापला माईक्रोस्कोपने शोधावे लागेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2 उल्हासनगरात सिंधूनगर मेट्रो स्थानक – मुख्यमंत्री
3 विदर्भात रिपब्लिकन पक्षांमधील दुहीचा लाभ कुणाला?
Just Now!
X