रेल्वेने बाहेरगावी पळून जाण्यासाठी आलेल्या एका मुलाला समाजमाध्यमावरील संदेशामुळे एका तरुणाने ओळखले. त्याचे मतपरिवर्तन केल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत मुलाला आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. शहरातील रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला.

सचिन सीताराम कातोरे (वय १४) हा मुलगा काल रेल्वे स्थानकावर आला. तो बाहेरगावी पळून जाणार होता. मात्र व्हॉट्सअपवर सचिन याचे छायाचित्र तसेच तो सकाळपासून घरातून निघून गेला आहे. कोणाला आढळल्यास अथवा दिसल्यास संपर्क करा, असा संदेश प्रसारित करण्यात आला होता.

रेल्वे स्थानकावरील वृत्तपत्र विक्रेते मिथुन पांडे यांनी हा संदेश पाहिला होता. रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या सचिनला पांडे यांनी ओळखले. पांडे यांनी सचिनबरोबर चर्चा केली. तेव्हा तो मला बाहेरगावी रेल्वेने जायचे आहे, असे सांगत होता. मात्र व्हॉट्सअपवरील संदेशामुळे त्याचे मतपरिवर्तन पांडे यांनी केले. नंतर त्याच्या पालकांना दूरध्वनी केला.

पांडे यांनी पुढाकार घेऊ न रेल्वे स्थानक प्रमुख एन.पी.सिंग, पोलीस हवालदार युनूस पठाण, पोलीस नाईक वैद्यनाथ बढे, पोलीस कर्मचारी सचिन गुप्ता, रेल्वे पोलीस दलाचे उपनिरीक्षक नेमीचंद मिना, तिकीट तपासनीस हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत सचिनला त्याच्या पालकाच्या स्वाधीन करण्यात आले.

समाजमाध्यमावरील माहिती व तरुणाच्या सतर्कतेमुळे घरातून बाहेरगावी रुसून चाललेला मुलगा पालकांना सुखरुप मिळाला.