आपल्या मुलांना उच्च दर्जाची शिक्षण व आदिवासी वसतिगृहात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून एका स्थानिक व्यक्तीने २५ मुलींना वसई तालुक्यातील वालीव येथील एका बाल गृहामध्ये डांबून ठेवल्याची तक्रार, काही आदिवासी पालकांनी वालीव पोलिसांकडे केली आहे.
डहाणू, तलासरी व पालघर तालुक्यातील आदिवासी बांधवांना त्यांच्या मुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत किंवा शहरी भागातील शाळांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल व त्यांच्या राहण्याची सुविधा आदिवासी वस्तीगृहामध्ये होईल, असे सांगून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ मुलींना वसई तालुक्यातील एका बालगृहांमध्ये ठेवण्यात आले होते. या मुलींच्या संगोपनासाठी व दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या खर्चासाठी शेती करणारे तसेच काही श्रमिक असणाऱ्या आदिवासी पालक दर महिन्याला काही वस्तू किंवा रोख दोन हजार रुपये या वस्तीगृहाकडे देत असत.
करोना संक्रमणामुळे जिल्ह्यातील आश्रम शाळेतील मुलांना घरी सोडून दिले असताना, आपल्या पाल्यांना घरी का पाठवले जात नाही? या करता या मुलींच्या पालकांनी पाठपुरावा सुरू केला असता, आपली मुली वास्तव्य करत असलेले ठिकाण वस्तीगृह नसून ज्या मुलांना काळजी व संरक्षणाची गरज असते त्यांच्यासाठी कार्यरत असलेले बाल गृह असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यासंदर्भात पालकांनी या बाल गृहाच्या व्यवस्थापनाशी व नंतर जिल्हा बाल कल्याण समिती सोबत पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. करोना संक्रमणाच्या काळात बाल गृहातून कोणत्याही बालकांना बाहेर सोडू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असल्याने, या मुली बालगृहात अडकून पडल्या होत्या. तर, बालगृहातून मुलींना बाहेर सोडताना आवश्यक प्रक्रियेची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्या अनुषंगाने अर्ज केलेल्या पालकांच्या घरी भेट देण्यात येऊन, त्याचा अहवाल तयार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आदिवासी वस्तीगृहात ठेवण्याच्या नावाखाली आपल्या मुलींना बालगृहात ठेवल्याचे समजल्याने संतप्त झालेल्या पालकांनी याबाबत पोलिसांकडे तसेच महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. एकीकडे या बालगृहातून याच भागातील सहा मुलीला कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता सोडून दिले असताना, उर्वरित 17 मुलींसाठी लांबलचक प्रक्रिया करण्याची गरज काय? असा सवाल पालकांनी केला आहे. या बालगृहातील आपल्या पाल्यांशी आपल्याला भेटून दिले जात नसल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे. तसेच, याविषयी जिल्हा बाल कल्याण समिती आणि बाल व महिला विकास समितीकडे लेखी तक्रार करणार असल्याचे पालकांनी सांगितले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2020 6:37 pm