12 December 2019

News Flash

हरवलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी आईवडिलांचे उपोषण

प्रकरणात निष्काळजी केल्याबद्दल दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

बोईसर पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप; सखोल चौकशीची मागणी

बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही वर्षभरात हरवलेली आपली मुलगी मिळत नसल्याने औंदा जिल्ह्य़ातील हिंगोली तालुक्यात नागनाथ येथील अनिता संदीप खिल्लारे हिचे वडील विठ्ठल नारायण थोरात व आई सखुबाई विठ्ठल थोरात यांनी मुलीला न्याय मिळावा, तसेच तिचा पती संदीप खिल्लारे याच्या विरोधात तक्रार नोंदवावी, या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा त्यांचा तिसरा दिवस आहे. प्रकरणात निष्काळजी केल्याबद्दल दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

विठ्ठल थोरात यांनी आपली मुलगी अनिता हिचे लग्न संदीप याच्याबरोबर लावून दिले होते. त्यानंतर संदीप नोकरीच्या शोधात मुंबईत आला. सर्वप्रथम तो आपल्या बहिणीकडे कल्याण येथे आला. तेथून नोकरीच्या शोधात बोईसर येथे आपली पत्नी अनितासोबत स्थलांतर झाला. येथे वर्षभर राहिल्यानंतर अनिताच्या आईवडिलांना तिच्या भावजयीने अचानक  दूरध्वनी केला व अनिता गेल्या तीन-चार दिवसांपासून हरवली असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर अनिताचे आईवडील २०१८ पासून ते आजतागायत अनिताच्या शोधात फिरत आहेत.

पत्नी अनिता भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेली असताना तिथून ती हरवली गेल्याची तक्रार तिचा पती संदीप यांनी बोईसर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावेळी बोईसर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदी कदम हे कार्यरत होते. आपली मुलगी हरवली असल्याची तक्रार वारंवार तिचे पालक आईवडील यांनी पोलीस ठाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच पोलीस महासंचालक यांनाही केलेली आहे.

जावई संदीप यांच्या खोलीवर असताना विठ्ठल यांना रक्ताने माखलेले शर्ट व रुमालही सापडला होता. ही बाब त्यांनी पोलिसांना कळवली. पोलिसानी ते शर्ट व रुमाल ताब्यात घेऊन अनिता हिचा खून तर झाला नाही ना, या संशयानंतर अनिताच्या आईवडिलांचे रक्त त्या शर्टावरील किंवा रुमालावरील आहे का, हे तपासणी करण्यासाठी घेतले होते, मात्र त्याचाही अहवाल काय आहे ते अनिताच्या आईवडिलांना सांगण्यात आलेला नाही.  गतवर्षी उपोषण करीत असताना प्रथमत: फत्तेसिंग पाटील यांनी त्यांना उपोषण करून दिले नाही. त्यानंतर दुसऱ्यांदाही त्यांनी उपोषण केले. मात्र आश्वासनांशिवाय त्यांच्या हाती काही लागले नाही. याप्रकरणी हलगर्जी करणारे पोलीस उपविभागीय अधिकारी फत्तेसिंग पाटील व पोलीस उपनिरीक्षक कदम यांच्यावर चौकशी करावी, तसेच अनिता हिचा पती संदीप खिलारे याचे पहिले लग्न झाल्यानंतरही त्याने फसवणूक करून अनिताशी लग्न केल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.  न्याय न देता नोकरी देण्याचा प्रकारमुलगी हरवली असल्याची तक्रार घेऊन हे दोघेही आईवडील तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी फत्तेसिंग पाटील यांच्याकडे गेले. आपल्याला न्याय मिळावा असे सांगून याप्रकरणी लक्ष घालावे व आपल्याला वेळोवेळी गावाकडून येणे शक्य नाही, तसेच आमच्याकडे तेवढे पैसेही नसतात असे सांगितले. पाटील यांनी त्यांना न्याय न देता नोकरी देतो असे सांगून आपल्या मूळ गावी (सातारा) असलेल्या उसाच्या मळ्यात कामासाठी पाठवले.

तिथे विठ्ठल व सखुबाई हे दोघेही दाम्पत्य त्या २० एकरी उसाच्या मळ्यात उसतोडीचे काम करीत होते. असे असताना चार महिने काम केल्यानंतरही त्यांना त्यांची मजुरी दिली गेली नाही. याउलट त्यांना महिन्याभराच्या पोटापाण्याचे सामान फत्तेसिंग पाटील यांचा मुकादम भरून देत होता, असे विठ्ठल यांनी सांगितले आहे. त्यानंतर मुकादमाला वारंवार दूरध्वनी केल्यानंतर त्यांनी फक्त चार हजार रुपये खात्यात दिल्याचे विठ्ठल यांनी सांगितले.

First Published on June 20, 2019 12:30 am

Web Title: parents fasting to search for a missing daughter
Just Now!
X