मद्यपी मुलाच्या त्रासाला कंटाळून कृत्य

हिंगोली :  सेनगाव तालुक्यातील सवना येथील संजय विठ्ठलराव नायक याच्या नशा केल्यानंतरच्या त्रासाला कंटाळून त्याचे वडील, आई व विवाहित बहिणीने गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कनेरगाव नाकानजीक जुन्या पुलावरून पैनगंगा नदीच्या पाण्यात उडी घेतली. हा प्रसंग आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाहताच ते घटनास्थळी धावत आले. विठ्ठल नायक यांना वाचवण्यात यश आले. शकुंतलाबाई नायक, उमा देशमुख या दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, या घटनेसंबंधी वाशीम जिल्ह्यतील पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

सवना येथील विठ्ठल अमृतराव नायक यांचा मुलगा संजय हा मद्यपी आहे. त्याच्या त्रासाला आई, वडील व त्याची बहीणही कंटाळली होती. विठ्ठलरावची मुलगी उमा हिचा विवाह कनेरगाव येथील देशमुख परिवारात झाला होता. परंतु लग्नानंतर तीन महिन्यांनी ही विवाहित मुलगी सवना येथे माहेरीच राहत होती. संजयच्या त्रासाला कंटाळून गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विठ्ठल नायक, त्याची पत्नी शकुंतला व मुलगी उमा देशमुख यांनी कनेरगावनजीक पैनगंगेच्या पुलावरून नदीच्या पाण्यात उडय़ा घेतल्या. हा प्रसंग आजूबाजूला शेतावर काम करणारे कैलास गावंडे, गजानन गावंडे, विठ्ठल बहादुरे यांनी पाहिल्यावर तत्काळ घटनास्थळावर जाऊन पाण्यात उडय़ा घेतल्या व त्या तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु विठ्ठल नायक याला वाचवण्यात त्यांना यश आले तर शकुंतला नायक व उमा देशमुख यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कनेरगाव नाका चौकीतील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी वाशीम जिल्ह्यच्या हद्दीत असल्याने वाशीमच्या पोलिसांना कळवले. वाशीमच्या पोलिसांनी मृत शकुंतला व उमा यांचे पाíथव शवविच्छेदनासाठी वाशीमच्या रुग्णालयात हलविले. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.