छायाचित्रांसह अहवाल न दिल्यास कारवाईचा सूचक इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २९ जानेवारीला होणारा ‘परीक्षा पे चर्चा-२’ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवण्याची सक्ती शाळांवर करण्यात आली आहे. दूरचित्रवाणी, इंटरनेट, रेडिओ यापैकी कोणत्याही माध्यमातून हा कार्यक्रम शाळांमध्ये करण्याचे शासनाच्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले असून, कार्यक्रम केल्याचा छायाचित्रांसह अहवाल न दिल्यास कारवाईचा सूचक इशाराही देण्यात आला आहे.

विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी या बाबतचे परिपत्रक शिक्षण उपसंचालक, मुख्याध्यापकांना पाठवले आहे. परीक्षा पे चर्चा-२ हा कार्यक्रम दूरचित्रवाणी वाहिन्यांसह फेसबुक लाइव्हद्वारे प्रसारित केला जाणार आहे. इयत्ता सहावीच्या पुढील विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम दाखवण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दुर्गम ठिकाणी ऑल इंडिया रेडिओवरून होणारे प्रसारण विद्यार्थ्यांना ऐकवावे. कार्यक्रमाच्या दिवशी वीज जाण्याची शक्यता असल्यास जनरेटरची व्यवस्था करावी, असा आदेश देण्यात आला आहे.

कार्यक्रमाबाबतचा जिल्ह्य़ाचा अहवाल दुपारी दोन वाजेपर्यंत http://www.research.net/r/RMMNMDG या दुव्यावर भरावा. जिल्हास्तर अहवालाचे एकत्रीकरण करून राज्याचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला चार वाजेपर्यंत सादर करायचा असल्याने अहवाल वेळेतच भरावा. जिल्ह्य़ात प्रक्षेपण सुरू असल्याबाबतची पाच छायाचित्रे आणि उच्च दर्जाची व्हीडिओ चित्रफीत करून ई मेल करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. अहवाल वेळेत न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल, असा सूचक इशारा देण्यात आला आहे.

‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम दाखवण्याची कल्पना चांगली आहे. मात्र, त्याची सक्ती करणे योग्य नाही. कार्यक्रम दाखवण्याचे आवाहन करता येऊ शकते. सक्तीमुळे कार्यक्रमाचा आत्मा, उत्स्फूर्तताच हरवून जाते आणि कार्यक्रम दाखवून अहवाल देण्याचा यांत्रिकपणा उरतो.    – डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ