बिल न भरल्यामुळे अग्निशामक दलाचे दूरध्वनी बंद. अपुरा कर्मचारीवर्ग. त्यामुळे लातूरच्या अग्निशामक दलास अर्धागवायू झाल्याचे चित्र आहे. परिणामी लातूरकरांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे ही बाब अधोरेखित झाली. नवीन आदर्श कॉलनीतील वीज खंडित झाला. डॉ. अजय मंदरकर यांच्या घरातील ए. सी. बंद पडला. ते वरच्या मजल्यावरून खाली आले, तेव्हा आग लागल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तातडीने आपल्या कुटुंबीयांना घराबाहेर काढले. जवळच्या मित्रांना दूरध्वनीवर कळविले. अग्निशामक दलाशी संपर्क मात्र होऊ शकला नाही. अखेर त्यांनी आपल्या भावाला अग्निशामक दल कार्यालयात पाठवले. तेव्हा तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी गाडीचा चालक नसल्याचे सांगितले. गाडी असूनही आग विझवण्यास येऊ शकत नसल्याची हतबलता व्यक्त केली.
दरम्यान, डॉ. मंदरकरांचे अनेक मित्र तेथे जमले व त्यांनी हौदातून बादल्यांनी पाणी काढून २५-३० जणांनी मिळून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या वेळी वीज अधिकारीही उपस्थित होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून पोलीसही आले. तासाभरात आग विझवल्यानंतर एमआयडीसी भागातील अग्निशामक दलाची गाडी कीर्ती उद्योग समूहातील एकाने संपर्क करून आणली. परंतु ‘आग रामेश्वरी अन् बोंब सोमेश्वरी’ अशी म्हण आहे. आग रामेश्वरीच लागली व बोंबही योग्य ठिकाणीच ठोकली गेली तरीदेखील त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
अग्निशामक दलाचे प्रभारी सुरक्षा अधिकारी ओमप्रकाश मुतंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी घटना पहिल्यांदाच घडली. दूरध्वनी बंद होते. अग्निशामक विभागाकडे अपुरा कर्मचारी वर्ग आहे. यापुढे अशी घटना घडणार नाही याची काळजी घेऊ, असे उत्तर दिले.
आर्थिक कोंडीत तणावाची भर
गेल्या ६ महिन्यांपासून लातूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पगार नाही. सरकारकडून अनुदान मिळत नाही. स्थानिक करवसुलीतूनच कर्मचाऱ्यांचे पगार करावे लागतात. पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अधिकचा ताण येतो. शिवाय दूरध्वनी बंद, अनेक सुविधाच नाहीत. त्यामुळे ताणातून असे प्रकार घडत असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.