News Flash

परीट, मातंग, नाभिक समाज आरक्षणाच्या प्रश्नी सरसावले

राज्यातील परीट समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याची मागणी घनसावंगी तालुका शाखेकडून करण्यात आली. मातंग व नाभिक समाजाच्या वतीनेही आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदने देऊन लक्ष वेधण्यात

| August 29, 2014 01:52 am

राज्यातील परीट समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याची मागणी राज्य परीट-धोबी समाज मंडळाच्या घनसावंगी तालुका शाखेकडून करण्यात आली. मातंग व नाभिक समाजाच्या वतीनेही आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदने देऊन लक्ष वेधण्यात आले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, १७ राज्यांमध्ये परीट समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत केला असला, तरी ११ राज्यांमध्ये मात्र हा समाज इतर मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट आहे. २००१ मध्ये राज्य सरकारने डॉ. डी. एम. भांडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनेही या समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची शिफारस केली. परंतु अजूनही राज्य सरकारने या संदर्भातील अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला नाही. तालुकाध्यक्ष डी. डी. सोनटक्के यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन सादर केले.
दरम्यान, मातंग समाजास स्वतंत्र ८ टक्के आरक्षणाची तरतूद करण्याची मागणी अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांनी भोकरदन येथे केली. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रम व मातंग मेळाव्यात ते म्हणाले की, स्वतंत्र आरक्षणाची मागणी मातंग समाज गेली अनेक वर्षे करीत असला, तरी सरकारदरबारी त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. कुसुमताई गोपले, प्रा. टी. आर. कांबळे, बी. जी. गायकवाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमापूर्वी नवीन भोकरदन भागात अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
नाभिक समाजास अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याची मागणी संतसेना महाराज नाभिक समाज सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एल. गिरी यांना दिलेल्या निवेदनात, कित्येक वर्षे नाभिक समाजाच्या मागण्यांकडे सरकारदरबारी दुर्लक्ष होत आहे. नाभिक समाजास अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत संरक्षण द्यावे, समाजकल्याण विभागाची लोखंडी टपरी योजना लागू करावी, गायरान जमीन द्यावी, खासगी व सहकार क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यावे, अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी शासकीय सेवेत सामावून घ्यावे आदी मागण्या केल्या आहेत. सुभाष काळे, सुरेश सदगुरे, वामन वैद्य, संजय शेजवळकर आदींनी हे निवेदन सादर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:52 am

Web Title: parit matang nabhik community demand reservation
Next Stories
1 आमदारांबद्दल गौप्यस्फोटानंतर अहवालासाठी हालचाली सुरू!
2 ‘लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार’ कृष्णा कल्ले यांना जाहीर
3 बोरीवली-साखरपा एसटी अपघातात एक ठार
Just Now!
X