पर्ससीन नेट बोटींना मच्छीमारीस मनाई करण्यात आल्यामुळे या बोटींवर काम करणारे परप्रांतीय खलाशी माघारी परतण्यास सुरुवात झाली आहे.
राज्य शासनाने गेल्या महिन्यात जारी केलेल्या नवीन मासेमारीविषयक धोरणानुसार ३१ डिसेंबरनंतर पर्ससीन नेटद्वारे मच्छीमारीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी शहर व जिल्ह्य़ातील पर्ससीन नेटधारकांनी गेला सुमारे महिनाभर ही बंदी उठवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न चालू केले आहेत. तसेच मोर्चा व धरणे आंदोलनाचाही अवलंब करण्यात आला. स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत सरकार दरबारीही प्रयत्न चालू आहेत. मात्र अजून त्यांना अपेक्षित निर्णय मिळालेला नाही. जिल्ह्य़ात सुमारे ४०० पर्ससीन नौका असून प्रत्येक नौकेवर सुमारे २५-३० खलाशी काम करतात. यापैकी अनेक खलाशी परप्रांतातून आले असून गेल्या काही वर्षांमध्ये तर थेट नेपाळमधूनही खलाशांची भरती केली जात आहे. मात्र मासेमारीवर बंदीच असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत या खलाशांना मासिक पगार व इतर भत्ते देणे पर्ससीन नेटधारकांना परवडेनासे झाले आहे. त्यामुळे अनेकांनी आपापल्या गावी माघारी जाण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान शहर परिसरातील मिनी पर्ससीन नेटधारकांनी आमदार उदय सामंत यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. त्यांनीही येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आश्वासन दिले आहे.