करवीरनगरीचे जलवैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या दुर्दैवाचे दशावतार संपण्याची चिन्हे नाहीत. रविवारी पहाटे पुन्हा रंकाळय़ाची तटबंदी कोसळली. शालिनी पॅलेसजवळ सुमारे तीस फुटांचा कठडा कोसळला. पंधरवडय़ापूर्वीच रंकाळय़ाची िभत तिसऱ्यांदा कोसळली होती. रंकाळय़ाची तटबंदी वारंवार कोसळू लागल्याने रंकाळाप्रेमींतून महापालिकेच्या निष्क्रियतेविरोधात संतापाचे लोण पसरू लागले आहे.
रंकाळा तलाव सभोवती उभारण्यात आलेली तटबंदी गेल्या वर्षभरापासून सतत कोसळत आहे. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास शालिनी पॅलेसजवळ असलेल्या बोटिंग घाटाजवळील कठडा कोसळला. सुमारे २५ ते ३० फूट कठडा कोसळल्याने रंकाळय़ाच्या तटबंदीचेच अस्तित्व धोक्यात आले आहे. तेथे असणाऱ्या महापालिकेच्या पहारेकऱ्यांनी रंकाळाप्रेमी, भाजपचे उपाध्यक्ष अशोक देसाई यांना ही माहिती दिली. रंकाळाप्रेमींनी कोसळलेल्या कठडय़ाची पाहणी करून महापालिका प्रशासनास माहिती दिली. तेथे आलेल्या डफळे व मेंगाणे या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी धारेवर धरले.
या प्रकाराबद्दल बोलताना अशोक देसाई यांनी महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रंकाळय़ाची दुरवस्था झाल्याचा आरोप केला. दुरुस्तीचे काम दहा लाखाचे असताना ८० लाखाचे बोगस एस्टिमेट करून मलिदा खाण्याचे काम पदाधिकारी अधिकारी करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. रंकाळय़ाच्या दुरवस्थेबद्दल आंदोलने, उपोषणे करूनही कोडग्या प्रशासनाला जाग येत नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.