राज्याच्या महाधिवक्ता पदावरून पायउतार झाल्यानंतर शनिवारी नागपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत श्रीहरी अणे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर टीकेचे आसूड ओढले. पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो, असा सणसणीत आरोप यावेळी अणेंनी केला. विदर्भ वेगळा झाल्यास खाणार काय, असा सवाल पश्चिम महाराष्ट्राचे नेते विचारतात. मात्र, आम्ही वेगळे झाल्यास पश्चिम महाराष्ट्र काय खाणार याचीच जास्त चिंता या नेत्यांना लागली असल्याची टीका अणेंनी केली. विदर्भाच्या वाट्याचा निधी अनेकदा पश्चिम महाराष्ट्राकडे वळविण्यात आला. पश्चिम महाराष्ट्राने वेळोवेळी विदर्भाच्या खिशातील पैसा अक्षरश: चोरला. अखेर राज्यपालांना परिपत्रक काढून हा प्रकार थांबवावा लागला. त्यानंतर विदर्भाच्या विकासासाठीचा निधी वर्षानुवर्षे शासनाच्या तिजोरीत पडून असल्याचे अणेंनी म्हटले.
विदर्भातील नेते नालायक असल्यामुळे विदर्भाचा विकास झाला नाही, असे पश्चिम महाराष्ट्रातील नेते म्हणतात. मात्र, यशवंतराव चव्हाणांपासून ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंतच्या पश्चिम महाराष्ट्रातील एकाही नेत्याला विदर्भाचा विकास करावा, असे वाटले नाही का, असा सवाल यावेळी अणेंनी विचारला. गेल्या ६० वर्षांत विदर्भात धरणे बांधण्यात आली नाहीत. आम्हाला हक्काचे पाणीदेखील झगडून मिळवावे लागत आहे. याशिवाय, वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत खैरे, राज ठाकरे आणि अन्य पक्षांकडून करण्यात येणाऱ्या टीकेमागे मतांचे राजकारण असल्याचेही अणेंनी सांगितले.