गोपीनाथ मुंडे यांच्या प्रत्येक चळवळीत त्यांची सोबत केलेले माजी आमदार पाशा पटेल यांना पक्षांतर्गत स्पर्धेतून आमदार पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेपासून दूर ठेवण्यात आल्याची बाब नांदेडचा टप्पा पार केल्यानंतर समोर आली.
पाशा पटेल शनिवारी मुंबईत होते. पंकजाताईंच्या यात्रेत ते कुठेही नाहीत, असे त्यांच्याशी संपर्क साधला असता स्पष्ट झाले. परभणीला या, म्हणून निरोप आला होता. महिन्याभराच्या तयारीने बॅग घेऊन गेलो होतो; पण पुढल्या प्रवासाची सूचनाच मिळाली नाही, असे पटेल यांनी सांगितले. शेतकरी संघटना सोडून भाजपमध्ये आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती झालेले पाशा पटेल भाजपतील अनेकांना खुपत होते. मुंडे यांची चांदा ते बांदा यात्रा असो किंवा गोदा परिक्रमा असो, पाशाभाई सदैव त्यांच्यासोबत होते. साथी व सारथी या दोन्ही भूमिका त्यांनी पार पाडल्या. पटेल यांनी कापूस दिंडी काढली, तेव्हाही मुंडे त्यात नियोजनानुसार सहभागी झाले होते.
दहा-पंधरा वर्षांच्या सहवासातून भाजपत मुंडेमय झालेले पटेल त्यांच्या निधनानंतर मात्र ‘अनाथ’ झाल्याचे पुन्हा संघर्षयात्रेनंतर दिसले. यात्रा नांदेड जिल्ह्य़ात आली तेव्हा सुजितसिंह ठाकूर व प्रवीण घुगे हे त्यातले सूत्रधार असल्याचे दिसून आले. विजय गव्हाणे, गोविंद केंद्रे ही मंडळीही दिसली. पण पाशा पटेल यांची अनुपस्थिती या सर्वाच्या उपस्थितीपेक्षाही लक्षवेधी ठरली.
शेती, शेतीचे प्रश्न, पाणी-दुष्काळ यावर बोलणारा मी कार्यकर्ता आहे. या विषयी काँग्रेसवाल्यांना मी चालतो; पण माझाच पक्ष मला बाजूला ठेवणार असेल तर काय करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी साहेबांच्या काळात इतका जवळ होतो की, त्यामुळे काहीजण दुखावले असतील. त्यांना आता मी नको असेल, असा अंदाजही पटेल यांनी वर्तविला.