डेक्कन क्वीनमध्ये मिळणारं ऑम्लेट खूप छान असतं अशी स्तुती अनेकदा होताना दिसते. अनेक प्रवासी मुंबई-पुणे प्रवासात हे ऑम्लेट खातात. मात्र याच ऑम्लेटमध्ये अळ्या आढळून आल्याची तक्रार एका प्रवाशाने केली आहे. सागर काळे यांनी प्रवासादरम्यान ऑम्लेट मागवलं. ऑम्लेट खायला सुरुवात केली तेव्हा त्यांना अळ्या आढळून आल्या. याबाबत सागर काळे यांनी सेंट्रल रेल्वे आणि आयआरसीटीसीशी संपर्क साधला. या प्रकरणात त्यांनी लक्ष घालावं अशीही मागणी केली. यासंदर्भातला एक व्हिडिओ काळे यांनी मध्य रेल्वेच्या पुणे कार्यालयाकडेही पाठवला आहे. ऑम्लेटमध्ये अळ्या निघाल्याने ते नाराज झाले. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली. याआधीही काहीवेळा असे प्रकार घडले आहेत. त्यावेळीही प्रवाशांनी आवाज उठवला आहे. तसाच तो या वेळीही उठवल्याचं पाहण्यास मिळालं आहे.