News Flash

Coronavirus: जायचं होतं घरी पण वाट पत्करावी लागली रुग्णालयाची!

घरी पोहोचण्यापूर्वी त्याला सहप्रवाशांनी रुग्णालयात पाठवलं.

Coronavirus: जायचं होतं घरी पण वाट पत्करावी लागली रुग्णालयाची!
कोल्हापूर : दुबईहून आलेल्या 'त्या' प्रवाशाला आरोग्य विभागाने काळजीपूर्वक आपल्या ताब्यात घेतले.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विदेशातून आलेल्या ‘त्या’ प्रवाशाने आवश्यक ती पुरेपूर दक्षता घेतली होती. चेहऱ्याला मास्क, हातात ग्लोज घालून प्रवास करणाऱ्या त्या प्रवाशाला पाहून सहप्रवाशांनी त्याला इप्सितस्थळी पोहोचण्यापूर्वी चक्क मध्येच एसटीमधून उतरवले. नाकाबंदी करून त्याला रुग्णालयात दाखल केले. ‘जायचे होते घरी पण वाट पत्करावी लागली रुग्णालयाची’ असा हा प्रकार वेगळा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी घडला.

त्याचं झालं असं की, दुबईहून एक प्रवासी मुंबईत दाखल झाला. मुंबई विमानतळावर त्याची कसून तपासणी करण्यात आली. शारीरिक दोष न दिसल्याने त्याला पुढे प्रवास करण्याची अनुमती देण्यात आली. त्यानंतर हा प्रवासी कोल्हापुरातील संभाजीनगर बस स्थानकात पोहचला. त्याला गारगोटीजवळील पुष्पनगर येथे जायचे होते. त्यासाठी त्याने गारगोटीला जाणाऱ्या एसटीत बसून प्रवासाला सुरुवात केली. चेहर्‍याचा मास्क, हाताला ग्लोज आणि शरीर काळजीपूर्वक साहित्याने झाकलेले अशा अवस्थेत तो प्रवाशी होता. करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्याने ही अवघी दक्षता घेतली होती. मात्र, ही दक्षता त्याच्या अंगलट आली. त्याचा हा असा अवतार पाहून एसटीमधील सहप्रवासी घाबरले. त्यांना हा करोना प्रादुर्भाव झालेला रुग्ण असावा अशी शंका भेडसावली.

नाकाबंदी करुन प्रवाशाला एसटीतून उतरवले

या भीतीतून प्रवाशांनी त्याला एसटीतून उतरण्याचा वारंवार सल्ला दिला. पण त्यानं आपली विमानतळावरील आरोग्य तपासणीची अधिकृत कागदपत्रं दाखवत एसटीतून उतरण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानं दाखवू केलेल्या कागदपत्रांवर विश्वास ठेवतो कोण? शंकेने कासावीस झालेल्या अन्य प्रवाशांनी इस्पुर्ली (तालुका करवीर) येथे पोलिसांना कळवून एसटी थांबवली. नाकाबंदीकरून या प्रवासाला एसटीतून खाली उतरण्यास भाग पाडले.

पुन्हा तपासणी करुन दिले सोडून

यावेळी येथे आरोग्य विभागाचे पथक वाहनासह सुसज्य होते. आवश्यक ती काळजी घेतलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या विदेशातून आलेल्या प्रवाशाला ताब्यात घेतले. त्याला कोल्हापुरातील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तपासणी केल्यावर दोष न दिसल्याने सोडून दिले, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या सूत्रांनी सांगितले. ‘जायचे होते घरी पण वाट पत्करावी लागली रुग्णालयाची’ अशी विचित्र अवस्था या प्रवाशांची झाल्याने त्याची समाज माध्यमावर उथळ सुलट चर्चा सुरु होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 8:37 pm

Web Title: passenger take care with mask and gloves due to corona virus but co passengers forced him down out of st aau 85
Next Stories
1 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही – जिल्हाधिकारी
2 शस्त्रधारी टोळक्याची कोल्हापूरजवळ दहशत
3 पुरुषांनी महिलांची कामं करावीत, मगच त्यांना मानते – रविना टंडन
Just Now!
X