कोकण रेल्वे मार्गावरील सुपरफास्ट एक्स्प्रेस अशी ओळख असलेल्या तेजस एक्स्प्रेसमधील २६ प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या प्रवाशांना चिपळूण येथील लाईफकेअर रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

ताशी २०० किमी वेगाने धावणारी वेगवान एक्स्प्रेस म्हणून तेजस एक्स्प्रेसचा लौकिक आहे.  रविवारी सकाळी आपल्या नियोजित वेळी ही एक्स्प्रेस निघाली. मात्र ही गाडी चिपळूण जवळ पोहोचताच काही प्रवाशांना उलट्या होण्याचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर चिपळूणमधील रूग्णालयात या प्रवाशांना तातडीने दाखल करण्यात आले.

तेजस एक्स्प्रेसचा प्रत्येक डबा तयार करण्यासाठी ३ कोटींपेक्षा जास्त खर्च आला आहे. या एक्स्प्रेसचे दरवाजे स्वयंचलित आहेत. शिवाय ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, चार्जिंग या सुविधाही देण्यात आल्या आहेत. ही ट्रेन आठवड्यातले पाच दिवस धावते. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील करमाळी हे अंतर कापण्यास या ट्रेनला ८.३० तासांचा अवधी लागतो.

आधुनिक रेल्वे प्रवासाचे स्वप्न तेजसच्या रूपाने पूर्णत्त्वास आले आहे. मात्र याच एक्स्प्रेसमधील प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाली. ही विषबाधा नेमकी कोणत्या अन्नातून झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वे अधिकाऱ्यांकडून या अन्नासंदर्भात तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.