सामाजिक दुरीच्या नियमांचे तीनतेरा, करोनाचाही संसर्ग

विरार : सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल रेल्वे सुरू नसल्याने खासगी कंपन्यांत काम करणाऱ्या प्रवाशांना एसटी बसचा आधार घ्यावा लागत आहे. प्रवाशांची संख्या वाढत असून दुसरीकडे एसटी महामंडळाने बसेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना दाटीवाटीने आणि गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. यामुळे करोनाच्या संसर्गाची देखील भीती वाढली आहे.

करोनामुळे असलेली टाळेबंदी शिथिल झाल्याने बहुतांशी खासगी कार्यालये सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांना कामावर येणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र लोकल रेल्वे सुरू नसल्याने एसटीचा आधार घ्यावा लागत आहे. राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू केली आहे. पण यात खासगी सेवेतील प्रवाशांना परवानगी दिली नसल्याने शहरतील हजारो प्रवाशांना आजही कामावर जाण्यासाठी एसटी बसचा आधार घ्यावा लागत आहे. दोन महिन्यात बस फेऱ्यांमध्ये वाढ न झाल्याने प्रवाशांच्या भर पावसात रांगा लागत आहेत.

दुसरीकडे या गर्दीत आता सणानिमित्त फिरणाऱ्या प्रवाशांची भर पडल्याने गर्दी वाढत आहे. लोक दाटीवाटीने बससाठी रांगा लावत आहेत. त्यात बस कमी असल्याने क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जात असल्याने. सामाजिक दुरीकरण आणि इतर नियमांचे उल्लंघन होत असल्याने करोनाचा प्रसार होण्याची भीती वाढली आहे. कार्यालयात जाण्यासाठी बसशिवाय कोणताही पर्याय नसल्याने सकाळी ४ वाजल्यापासून बससाठी रांगा लागत आहेत.

बसेसच्या फेऱ्या वाढवाव्या या मागणीसाठी जुलै महिन्यात प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले होते.

बसमधून ५० हून अधिक प्रवासी

* या बसमध्ये केवळ २२ प्रवासी आसनावर बसून तर ५ प्रवासी उभे राहून प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र असे असतानाही एसटीकडून या बसमध्ये ५० हून अधिक प्रवाशी भरले जात आहेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने सामाजिक अंतराचे नियम पाळले जात नाहीत. तसेच प्रवाशी तासन्तास रांगेत उभे राहत असतानासुद्धा सामाजिक अंतराचे भान ठेवले जात नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रांगेत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांची कोणतीही सोय प्रशासनाने केली नाही. अचानक पाऊस सुरू झाल्यास मोठी तारांबळ उडते. कर्मचाऱ्यांना धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. शासनाने खासगी प्रवाशांसाठी सुद्धा रेल्वेची सोय करावी अशी मागणी आता हे कर्मचारी करत आहेत.

* नालासोपारा आगाराच्या प्रमुख प्रज्ञा सानप यांनी माहिती दिली की, अद्याप कोणत्याही बस फेऱ्या वाढविल्या नाहीत. नालासोपारा बस आगारातून केवळ दिवसाला सकाळी ६५ आणि दुपारी ६५ बस सोडल्या जातात. अर्नाळा बस आगाराचे प्रमुख डी. एम. बेलदार यांनी सांगितले की, अर्नाळा बस आगारातून मुंबईला केवळ ५० बस सोडल्या जातात. जर नियम पाळले तर कोणत्याही प्रवाशाला प्रवास करणे शक्य होणार नाही. इतक्या कमी बस संख्येमध्ये हजारो प्रवाशी कसे प्रवास करणार अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मला रोज अंधेरीला कामावर जावे लागत आहे. सकाळी ९ वाजताच्या डय़ुटीसाठी सकाळी ६ वाजता रांगेत उभे राहावे लागत आहे. तर बोरीवलीहून पुन्हा दुसरी बस पकडावी लागते. बस कमी असल्याने गर्दीतच प्रवास करावा लागतो. करोनामुळे नाही तर उपासमारीने मरावे लागेल

– उदयसिंग उभेदार, नोकरदार

मला घराची सर्व कामे करून तासन्तास बससाठी रांगेत उभे राहावे लागते.  बसमध्येसुद्धा ५० ते ६० प्रवाशी असतात आता कुठे कुठे नियम पाळणार. 

– पल्लवी शेंडे, विरार